मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत असते. यादरम्यान आता वनिता ही ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील वनिताच्या लूकने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
येत्या 24 नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात वनिता दाक्षिणात्य अंदाजात दिसणार आहे. “वेगळी भूमिका करण्याची संधी प्रत्येक कलाकार शोधत असतो. ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने ही संधी मला मिळाली असून माझं हे पात्र प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील”, असा विश्वास वनिताने यावेळी व्यक्त केला.
वनितानं तिच्या ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटामधील लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘एकदा येऊन तर बघा’ माझा South Indian अवतार ! प्रेमळ माणसांनी प्रेमाने केलेली कलाकृती! 24 नोव्हेंबरपासून फक्त सिनेमागृहात’ असे कॅप्शन दिले आहे.
या चित्रपटात वनितासोबत गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार, राजेंद्र शिसातकर, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, रोहित माने हे कलाकार दिसणार आहेत. लेखक-अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.