मुंबई : अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिच्या ड्रायव्हरला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्दाम मंडल (वय 32) असे मारहाण करण्यात आलेल्या ड्रायव्हरचे नाव आहे. त्यानं हॉर्न वाजल्याने रागाच्या भरात चार जणांनी बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार मालवणीच्या अंबुजवाडी या ठिकाणी घडला आहे. अंबुजवाडी येथील ऑटो रिक्षा स्टॅण्ड येथील गेट क्रंमाक आठ या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी मलिक या नावाच्या व्यक्तीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाकी लोकांचा तपास सुरु आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
सद्दाम हा गेली सहा वर्षे सई ताम्हणकरचा ड्रायव्हर आहे. हा प्रकार 13 ऑगस्ट रोजी घडला असून यावेळी सई ताम्हणकरला चिंचोळी भंडार येथून घरी जाताना त्याला मारहाण करण्यात आली होती. त्याला चार तरूणांनी बेल्ट आणि बांबू स्टीकनं मारहाण केली. मारहाण करणारे चौघंजण फारच विक्षिप्तपद्धतीनं रस्त्यावर गाडी चालवत होते त्यामुळे अपघात होऊ शकला असता तो टाळण्यासाठी सद्दाम हा हॉर्न वाजवत होता परंतु त्याचाच राग आल्याने त्यांनी ही मारहाण केली आहे.
सई ताम्हणकर हिनं अनेक मराठी मालिका आणि चित्रपट यांच्यातून कामं केली आहेत. त्यामुळे तिची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली असते. नुकतीच ती दुनियादारी या चित्रपटाच्या 10 वर्षपुर्तीनिमित्त प्रेक्षकांच्या समोर आली होती. यानिमित्तानं ‘चला हवा येऊ द्या’नं एक विशेष कार्यक्रम भरवला होता. सई ताम्हणकर ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिचे इन्टाग्रामवरही चांगलेच फॉलोवर्स आहेत. तिची एक वेबसिरिजही प्रदर्शित होणार आहे. तिची ‘क्राईम बीट’ ही वेबसिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.