अहमदनगर : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) ही तिच्या डान्समुळे नेहमी चर्चेत असते. तिचा कार्यक्रम म्हंटला तर लोकांची गर्दी आली. आणि गर्दी आली कि राडा आलाच. गौतमी आणि राडा हे जणू समीकरणच बनलं आहे. मागच्या काही महिन्यांपासुन तिचा कार्यक्रम आणि राडा ठरलेलंच आहे. आता पुन्हा एकदा गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गौतमी पाटीलवर एका कार्यक्रमासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोडवर काल सायंकाळी मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळ यांच्यावतीने गौतमी पाटील नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास प्रशासनाने परवानगी नाकारली होती. मात्र, तरीही हा कार्यक्रम घेतल्यामुळे पोलिसांनी आता गौतमी पाटीलसह तिचा स्वीय सहाय्यक अशोक खरात याच्यांवर गुन्हा दाखल केला आहे. एवढंच नाहीतर गौतमीसह कार्यक्रमाचे आयोजक असलेले मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल सांगळे, आनंद कैलास नाकाडे, हर्षल किशोर भागवत, यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.
रस्त्यात अडथळा निर्माण होईल असे कार्यक्रम घेणे तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी क्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन करून डी जे सिस्टीम लावून कर्णकर्कश आवाजामध्ये गाणी लावून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करणे, वारंवार आवाज कमी करण्याच्या सूचना देऊनही सूचनांकडे दुर्लक्ष करणे या कारणांसाठी भादवी कलम 188, 283, 341, 34 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 2, 15 व ध्वनी प्रदुषण अधिनियम 2000 चे कलम 3, 4, 5, 6, मु.पो.का.क 37 (1) (3)/ 135 अंतर्गत तोफखाना पोलीसांनी ही कारवाई केली आहे. यामुळे आता गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
 
                         
                                 
                             
                             
                             
                            