संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही फरार असताना या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलेलं दिसून येत आहे. याच हत्येबाबत बोलत असताना भाजपा आमदार सुरेश धस मंत्री धनंजय मुंडेंवर टीका करत होते. याचवेळी त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali), रश्मिका मंदाना (rashmika mandana) आणि सपना चौधरी (sapna chaudhary)यांची नावं घेतली. कुणाला इव्हेंट पॉलिटिक्स शिकायचं असल्यास बीडमध्ये या असं ते म्हणाले. मात्र अभिनेत्रींची नावे घेतल्यामुळे सुरेश धस अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. अभिनेते किरण माने (actor kiran mane) यांनी देखील आपल्या फेसबुक पोस्ट मधून लक्ष वेधलं आहे.
‘प्राजक्ता माळीचा जवळचा पत्ता परळी, बीड आहे’, असं गंभीर विधान सुरेश धस यांनी केल्यामुळे प्राजक्ता माळी आक्रमक झाली आहे. त्यामुळेच प्राजक्ताने 28 डिसेंबरला मुंबईत पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केली. सुरेश धस यांनी जाहीर रित्या आपली माफी मागावी, अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, असा इशारा तिने दिला. त्यावरूनच आता सिनेसृष्टीतील अनेक कलाकार प्राजक्ता माळी हिच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी, लोकप्रिय निर्माते नितीन वैद्य, अभिनेते कुशल बद्रिके, पृथ्वीक प्रताप, गौतमी पाटील, मुग्धा गोडबोले अशा अनेक कलाकारांनी प्राजक्ताला पाठिंबा दर्शवला आहे. त्यानंतर आता वेळोवेळी सामाजिक राजकीय विषयावर आपलं मत रोखठोकपणे मांडणारे अभिनेते किरण माने यांनी देखील फेसबुक पोस्ट करत आपलं मत मांडलं आहे.
काय म्हणाले किरण माने ?
किरण माने हे अभिनेते असण्याबरोबरच शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत. किरण माने यांनी लिहिलं की, ‘प्राजक्ताबाबतचे विधान निंदनियचं आहे…त्याचा निषेध. पण सोनियाजींचे बिकीनीवरचे फोटो व्हायरल झाले होते…कुस्तीगीर महिला लैंगिक शोषणाविषयी दाद मागत होत्या…मणिपूरला भगिनींची विटंबना झाली…तेव्हा जे महाभाग मूग गिळून वगैरे गप्प बसले, त्यांना अचानक भयानक ‘समस्त महिला वर्गाविषयी’ पुळका वगैरे यावा हे फार विनोदी वगैरे आहे…#सुमारांचा_थयथयाट’