पुणे- सर्वसामान्यांपासून कष्टकरी वर्गाचे आवडतं पेय चहा आता महागणार आहे. टी कॉफी असोसिएशनच्या वतीने राज्यात चहाचे दर दोन रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूध दरवाढीनंतर चहाचा दर वाढवण्यात आल्यामुळे सर्वसामान्यच्या खिशाला कात्री लागणार आहे.
काही दिवसांपूर्वीच दुधाच्या दरात दोन रुपये प्रति लिटर इतकी दरवाढ करण्यात आली होती. महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज, अमूल, मदर डेअरी आदींनी दुधाच्या दरात दोन रुपयांनी दरवाढ केली आहे. त्याशिवाय चहासाठी आवश्यक असणाऱ्या इतर वस्तूंच्या दरात वाढ होत असल्याने चहा विक्रेत्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे चहा विक्रेत्यांची संघटना असलेल्या टी कॉफी असोसिएशनच्यावतीने चहाच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला.
आता १० रुपयाने मिळणाऱ्या चहासाठी १२ रुपये मोजावे लागणार आहेत.
कॉफी महागली
कॉफीच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. Bru च्या किंमतीमध्ये तीन ते सात टक्केंनी वाढ झाली आहे. त्याशिवाय ब्रू गोल्ड कॉफीच्या किंमतीत तीन ते चार टक्के वाढ झाली आहे. नेस्ले इंडियाच्या A+milk च्या एक लीटर वाल्या पाकिटाची किंमत चार टक्केंनी वाढली आहे. त्यामुळे या पाकिटाची किंमत 78 रुपये झाली आहे. याआधी हे पाकिट 75 रुपयांना मिळत होते. नेस्कॅफे क्लासिकच्या 25 ग्रॅम वाल्या पाकिटाची किंमत 2.5 टक्केंनी वाढून 80 रुपयांना झाली आहे. याची किंमत आधी 78 रुपये होती. नेस्कॅफे क्लासिक 50 ग्रॅमच्या पाकिटाची किंमत 145 रुपयांवरुन 150 रुपये झाली आहे.