औरंगाबाद- औरंगाबाद जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी शाळेने मोठा मांडव टाकून त्यामध्ये विद्यार्थ्यांना बसण्याची सोय केली. एवढेच नाही तर मुलांना चक्क गाईडद्वारे कॉप्याही पुरवल्या. शिक्षण विभागाने शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून यामध्ये शाळेतील शिक्षकच दहावीच्या विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवत असल्याचे दिसून येत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील निलजगाव इथल्या लक्ष्मीबाई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत हा प्रकार घडला आहे. बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी शाळेने चक्क लग्न समारंभात टाकतात, तो मंडप टाकून व्यवस्था केली. या मंडपातच मुलांना परीक्षेला बसवलं. त्याच शाळेत दहावीचीही परीक्षा घेतली आणि त्यात तर मुलांना चक्क गाईडद्वारे कॉप्याही पुरवल्या.
या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये बालभारतीचं गाईड घेऊन एक शिक्षक पळताना दिसतोय. एकूणच या प्रकाराची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली असून या शाळेची मान्यता रद्द केल्याचे आदेश जारी केले आहेत.