नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कालच संसदेत दिल्लीमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या व अन्य सेवांच्या निर्णयाचे अधिकार केंद्र सरकारकडे देणारे दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेमध्ये मंजूर झालं आहे. 131 विरुद्ध 102 मतांनी हे विधेयक मंजूर झालं. या विध्येकाच्या निमित्ताने संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील शक्तीप्रदर्शनामध्ये भारतीय जनता पार्टीप्रणीत ‘एनडीए’ने विरोधकांच्या ‘इंडिया’ महाआघाडीवर मात केल्याचं पहायला मिळालं. हे विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेमध्ये मांडले होते.
अमित शाहांचा हल्लाबोल
अमित शाह (Amit Shah) यांनी आपल्या भाषणामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. या विधेयकाचा उद्देश भ्रष्टाचारमुक्त शासन निर्माण करण्याचा आहे. या विधेयकामधील एकही तरतूद अशी नाही की ज्यामुळे आधीच्या व्यवस्थेला काहीही धक्का लागेल. हे विधेयक कोणत्याही पंतप्रधानांना वाचवण्यासाठी नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला. काँग्रेसला लोकशाहीबद्दल बोलण्याचा हक्क नाही. आपच्या मांडीवर बसलेल्या काँग्रेसनेच आधी हे विधेयक आणलं होते याची आठवणसुद्धा अमित शाह यांनी आपल्या भाषणादरम्यान करून दिली.
विपक्ष चाहे तो और 4-5 साथियों को जोड़ ले, लेकिन 2024 में आयेंगे तो मोदी जी ही… pic.twitter.com/EYDXJEzRZ4
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) August 7, 2023
येणार तर मोदीच
आपल्या भाषणादरम्यान शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधताना, तुम्ही काहीही केलं तरी 2024 ला मोदीच पंतप्रधान होणार असं थेट आव्हान दिलं. “हे सर्वजण एकत्र का आले आहेत? हे एकत्र आले आहेत कारण त्यांना विश्वास आहे की एकट्याने काही होणार नाही. एकत्र आले तर काहीतरी करु शकतो असं त्यांना वाटतंय. मात्र मी आज सांगू इच्छितो की अजून 5-10 लोकांना तुमच्यात घेतलं तरी काहीच होणार नाही. मे 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत,” असे अमित शाह यांनी ठणकावून सांगितले आहे. सध्या त्यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.