नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना त्यांच्या 9 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकतच त्यांना फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले. आतापर्यंत 14 देशांनी त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने मोदींना गौरविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना मिळालेल्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांचा आढावा जाणून घेऊयात…
‘हा’ असेल विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा; राऊतांनी थेट सांगूनच टाकलं !
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा जगभर पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांच्या कार्याची दखल घेऊन अमेरिका, रशियासह अनेक राष्ट्रांनी त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांच्या या गौरवात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे आणि दूरदृष्टीचे प्रतिबिंब दिसून येते. या पुरस्कारांमुळे जागतिक स्तरावर होत असलेल्या भारताच्या उदयाला अधिक बळ मिळाले आहे. जगभरातील देशांबरोबर भारताचे वृद्धिंगत होत असलेले संबंधही त्यातून प्रतीत होतात. सौदी अरेबियाने सर्वप्रथम 2016 मध्ये मोदींना सन्मानित केले होते. त्याचवर्षी अफगाणिस्ताननेही त्यांचा गौरव केला होता. पॅलेस्टाईन, संयुक्त अरब अमिराती, रशिया, मालदीव, अमेरिका, भूतान या देशांनीही मोदी यांना सन्मानित केले आहे. त्याशिवाय जगभरातील अनेक प्रतिष्ठित संस्थांनीही त्यांना गौरवलेले आहे.
नरेंद्र मोदींना आतापर्यंत ‘या’ पुरस्कारांनी गौरवण्यात आले
एप्रिल 2016 मध्ये, सौदी अरेबियाच्या दौऱ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘किंग अब्दुलअझीझ’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं
2016 मध्येच पंतप्रधान मोदींना ‘स्टेट ऑर्डर ऑफ गाजी अमीर अमानुल्ला खान’ – हा अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविण्यात आलं.
2018 मध्ये, पॅलेस्टाईनला ऐतिहासिक भेट दिली तेव्हा त्यांना ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परदेशातील मान्यवरांना दिला जाणारा हा पॅलेस्टाईनचा सर्वोच्च सन्मान आहे.
2019 मध्ये, पंतप्रधानांना ऑर्डर ऑफ झायेद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
रशियाने पंतप्रधान मोदींना 2019 मध्ये त्यांचा – ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू पुरस्कार हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला.
2019 मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदींना परदेशी मान्यवरांना देण्यात येणारा मालदीवचा ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रुल ऑफ निशान इज्जुद्दीन हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला.
2019 मध्येच बहारीनने त्यांचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ द रेनेसॉन्स या पुरस्काराने मोदींना गौरवले आहे.
2020 मध्ये अमेरिकेने त्यांच्या लेगीन ऑफ मेरिट या सर्वोच्च पुरस्काराने पंतप्रधान मोदींना सन्मानित केले आहे.
2021 मध्ये भूतानने ऑर्डर ऑफ द डक या पुरस्काराने गौरवले आहे.
2023 मध्ये पाच देशांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मानकरी ठरले आहेत.
मे 2023 मध्ये पलाऊचा रिपब्लिक अवॉर्ड
मे 2023 मध्येच फिजी देशाचा चॅम्पियन ऑफ द ऑर्डर
मे 2023 मध्येच न्यू गिनीया देशाचा कम्पॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू हा पुरस्कार देण्यात आला
जून 2023 मध्ये इजिप्तचा ऑर्डर ऑफ दि नाईल या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले.
नुकतच 14 जुलैला फ्रान्सच्या ग्रँड ग्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अनेक देशांच्या सर्वोच्च नागरी सन्मानांव्यतिरिक्त, जगभरातील अनेक प्रतिष्ठित संस्थांनीही पंतप्रधान मोदींचा (Narendra Modi) विविध पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. यावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा किती करिष्मा आहे हे लक्षात येतं.