चेन्नई- चेन्नईमधील राजीव गांधी सरकारी रुग्णालयात बुधवारी सकाळी आग लागली. आग आटोक्यात आणण्यात आली असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि नंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या आणखी गाड्या मागवण्यात आल्या. ICU मधील तीन रुग्णांसह एकूण 33 रूग्णांना हॉस्पिटलच्या आवारात सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
“सर्व रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. जुन्या इमारतींपैकी एका इमारतीला आग लागली, नवीन तीन ब्लॉक आगीपासून सुरक्षित आहेत. आतापर्यंत, कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही,” तामिळनाडू सरकारचे प्रधान सचिव (आरोग्य) डॉ जे राधाकृष्णन यांनी पत्रकारांना सांगितले.