Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा तरुणालाच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

1296 0

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालन्यामध्ये मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडे, राज्यभरात मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या आंदोलकांकडून राज्यात मोर्चे, तोडफोड, जाळपोळ केली जात आहे. पक्षांची कार्यालये, आमदारांची घरेदेखील काही ठिकाणी जाळली जात आहेत. यादरम्यान सोलापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने मराठा समाजाविरोधात चुकीचं वक्तव्य केलं म्हणून अंगावर ऑइल टाकून त्याला मारहाण करण्यात आली.

सोलापुरात कुणबी प्रमाणपत्राला विरोध करणाऱ्या मराठा व्यक्तीला मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला. प्रताप कांचन असं या व्यक्तीचे नाव आहे. प्रताप कांचन यांनी 96 कुळी आहे, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको, असं विधान केलं होतं. त्यामुळे संतापलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रताप कांचन या व्यक्तीला शोधून काढलं. यानंतर त्याला घेराव घातला. त्यांच्या अंगावर ऑइल टाकण्यात आलं. प्रताप कांचन आणि सुनील नागणे यांनी कांही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी विरोध केला होता.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रताप कांचन यांना शोधून काढून त्याच्या कानाशिलात लगावली आणि उठबशा मारायला लावल्या. यावेळी प्रताप कांचन याने मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांची माफी देखील मागितली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Share This News
error: Content is protected !!