Vinod Patil

Maratha Reservation : ‘छातीवर हात ठेवून सांगा…’, विनोद पाटलांनी रोखठोक भूमिका घेत छगन भुजबळांवर केली टीका

424 0

मुंबई : शिंदे सरकाराने मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाबतीत काढण्यात आलेल्या अध्यादेशावरून सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात गदारोळ सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अनेकांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय तर अनेकांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. ओबीसीला धक्का लागणार नाही असं म्हणतात आणि मागच्या दारानं एन्ट्री करतात, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. त्यावर आता मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले विनोद पाटील?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सगेसोयरे बाबत काढलेल्या जीआरचं मनापासून स्वागत आहे. आमचे सहकारी मनोज जरांगे पाटील यांचे हार्दिक अभिनंदन! समस्त मराठा समाजाच्या एकीमुळे हा ऐतिहासिक निर्णय झाला, असं विनोद पाटील म्हणाले. यादरम्यान ‘मराठ्यांना ओबीसी मध्ये मागच्या दाराने घुसवलं जात आहे,’ असं भुजबळ साहेबांनी वक्तव्य केलं आणि त्यांना आजचा निर्णय मान्य नाही. त्या विरोधात न्यायालयीन लढाई ते लढणार आहेत. माझा भुजबळ साहेबांना सवाल आहे की, खरोखरच संपूर्ण मराठा समाज ओबीसीत आला आहे का? खरंच 54 लाख कुणबी नोंदी मिळाल्या का? भुजबळ साहेब आपण जबाबदार मंत्री आहात, तुम्हाला देखील खरी हकीकत माहित आहे. तरी देखील विनाकारण तेढ निर्माण करणारे वक्तव्य आपण करत आहात, असे विनोद पाटील म्हणाले आहेत.

मराठ्यांना ओबीसीत सामील करून घेण्याचा कुठलाही निर्णय झालेलाच नाही. तुमचे सदरील स्टेटमेंट बिनबुडाचे आहे! आपण राज्याचे मंत्री म्हणून जबाबदारीने वक्तव्य केले पाहिजे. सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो, ज्यांच्या नोंदी झालेल्या नाहीत, अशा सर्वांसाठीच शेवटच्या श्वासापर्यंत मी न्यायालयीन लढाई लढणार आहे. क्युरेटीव्ह पिटीशनचा निकाल मराठा समाजाच्या बाजूनेच येईल, हा मला ठाम विश्वास आहे असेदेखील ते म्हणाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!