Neelam Gorhe

Neelam Gorhe : सामाजिक कार्यकर्त्या ते विधान परिषद उपसभापती कसा आहे नीलम गोऱ्हेंचा राजकीय प्रवास

1039 0

मुंबई : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. हा ठाकरे गटाला मोठा झटका समजला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. पण उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांचा प्रवेश हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. नीलम गोऱ्हे यांचा राजकीय प्रवास कसा आहे चला जाणून घेऊयात….

मुंबईतल्या पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयातून 1977 साली वैद्यकीय पदवी घेऊन नीलम गोऱ्हेंनी वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. 1992 मध्ये त्यांनी बँकॉक येथील एशियन लोकविकास संस्थेत प्रशिक्षण विषयक डिप्लोमाही पूर्ण केला आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व आहे. दुसरीकडे त्यांनी युवक क्रांती दल म्हणजेच युक्रांदच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नावर काम करायला सुरुवात केली. कुमार सप्तर्षींसारख्या काही तरुणांनी युक्रांदची सुरुवात केली होती. भूमीहिन दलित, ऊसतोडणी कामगार, मजूर, शोषित यांच्याप्रमाणेच स्त्री मुक्ती, त्यांना मिळणारी मजुरी, त्यांचं स्वातंत्र्य, त्यांचे अधिकार, त्यांचे आरोग्य या समस्यांवरही युक्रांदचं कार्य चालायचं. त्यांच्यासोबत काम करत असतानाच 1987 पासून नीलम गोऱ्हे पूर्णवेळ सामाजिक आणि राजकीय कार्यात सहभागी झाल्या. नीलम गोऱ्हेंच्या कामामुळे महिला प्रश्नाला नवं परिमाण मिळालं. त्यातून हा प्रश्न राजकारण्यांच्या अजेंड्यावर आला. नीलम गोऱ्हेंच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही रिपब्लिकन पक्षापासून झाली. रिपब्लिकन पक्षासोबत काम करताना त्यांनी महिलांचे प्रश्न, दलितांचे प्रश्न यावर अनेक आंदोलनं केली. त्यांनी प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांच्यासोबत काम केलं. पुढे त्यांनी काही काळ शरद पवार यांच्यासोबतही काम केलं. कधी डावे पक्ष कधी समाजवादी अशा सर्वांसोबत नीलमताई कधी ना कधी संलग्न राहिल्या आहेत.

Viral Video : धक्कादायक ! सुनेने सासऱ्याला रस्त्यावर पळवून पळवून हाणलं; Video आला समोर

यानंतर त्यांनी 22 फेब्रुवारी 1998 रोजी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता तेव्हापासून त्यांनी कायमच शिवसेनेची बाजू ठामपणे मांडली. आपल्या कर्तृत्वावर त्यांनी शिवसेनेत उपनेतेपद, पश्चिम महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुखपद, आमदारकी आणि प्रवक्तेपदही मिळवलं. नीलम गोऱ्हे शिवसेनेत आल्या. मात्र, त्यांची वाट सोपी नव्हती. त्यांची शिवसेनेतील कारकीर्द कशाप्रकारे राहिली चला पाहुयात…

नीलम गोऱ्हे यांनी पक्षात आल्याबरोबर झपाट्याने काम सुरू केलं. त्यामुळे त्यांची वर्णी विधान परिषदेवर लागली. त्यानंतर शिवसेनेतच एक वेगळा संघर्ष सुरू झाला. सेनेतले अनेक पुरुष नेते अचंबित झाले. मात्र, बाळासाहेबांचा निर्णय असल्याने कुणी काही बोललं नाही. मुळात शिवसेना एक पुरुषी चेहऱ्याचा पक्ष आहे. महत्त्वाच्या पदांवर पुरुषच आहेत. शिवसेनेची महिला आघाडी होती. मात्र एखाद्या चित्रपटाला विरोध कर, लैंगिक शोषणाची तक्रार आल्यास आरोपीला जोड्यांनी मार, काळं फास अशा लहानसहान आंदोलनापुरतीच होती. नीलम गोऱ्हेंच्या येण्याने ही महिला आघाडी अस्वस्थ झाली.

Neelam Gorhe : नीलम गोऱ्हेंचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश

नीलम गोऱ्हेंमुळे शिवसेनेत आक्रमक नगरसेविका विरुद्ध गोऱ्हे असे तट पडले. अनेक महिला बाळासाहेबांकडे तक्रारी घेऊन जायच्या. त्यावर बाळासाहेब म्हणायचे तिच्यासारखं संघटन तयार करून दाखवा. बाळासाहेब ठाकरेंच्या मर्जीतल्या असूनदेखील 2014 ला जेव्हा भाजप-शिवसेनेचं सरकार आलं त्यावेळी गोऱ्हेंना मंत्रिपद मिळालं नाही. मंत्रिपद कोणाला द्यायचं, यावर चर्चा सुरू झाली तेव्हा शिवसेनेत मोठा वाद झाला आणि गोऱ्हेंच्या नावाला सगळ्यांनी विरोध केला. त्यांच्या जागी डॉ. दीपक सावंत यांचं नाव पुढं आलं. त्यानंतर त्यांना प्रवक्तेपद देण्यात आलं. प्रवक्त्या म्हणूनही त्यांची कामगिरी उत्तम होती. तरीदेखील त्यांना काही मिळालं नाही. विधान परिषदेचं सदस्यत्व मिळालं. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात नीलम गोऱ्हेंना मंत्रिपद किंवा किमान राज्यमंत्रिपद मिळेल अशी आशा होती. मात्र, शिवसेनेतली लॉबी इतकी स्ट्राँग होती की तेही शक्य झालं नाही. या सर्वांमुळे नीलम गोऱ्हे खूप दुखावल्या गेल्या.

महिलांसाठी केलेली कामे
1984 साली त्यांनी स्त्री आधार केंद्राची स्थापना केली.
वेगवेगळी वृत्तपत्र, मासिकं आणि दिवाळी अंकातून त्यांनी 700च्या वर लेख लिहिले आहेत.
‘उरल्या कहाण्या’ या त्यांच्या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचं श्रेष्ठता पारितोषिक मिळालं आहे. तर त्यांच्या पहिल्याच कथेला किर्लोस्कर पारितोषिक मिळालं होतं.
नारीपर्व, माणूसपणाच्या वाटेवर, समाज आणि महिला, स्त्रियांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग, नव्या शतकासाठी महिला धोरण व अंमलबजावणी अशी काही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.
पंचायत राज, महिला विकास, स्त्रियांवर होणारे अत्याचार या विषयांवर त्यांनी 500 हून अधिक व्याख्यानं दिली आहेत.
1999-2000 मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा होत्या. चित्रपट सेन्सॉर बोर्ड आणि नाट्य परिक्षण मंडळावरही त्यांनी कार्य केलं आहे.

त्यामुळे एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून नीलम गोऱ्हेंकडे बघितलं जायचं. पण त्यांचा आजचा निर्णय हा ठाकरे गटातली उरली सुरली नारजी चव्हाट्यावर आणणारा आहे. शिवसेनेची रणरागिणी, ठाकरे गटाची बाजू अभ्यासू आणि खंबीरपणे मांडणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. येणाऱ्या काळात अजून कोण शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!