Nashik News : शेतकरी संकटात! कांदा प्रश्नावर तोडगा नाहीच; आजही लिलाव बंद
नाशिक : सध्या नाशिकमध्ये (Nashik News) कांदा लिलाव करणाऱ्या व्यापाऱ्यांचा संप सुरु आहे. निर्यात शुल्क रद्द करण्याच्या मागणी सोबत इतर मागण्यासाठी हा संप सुरु आहे. एक आठवडा झाला तरी या संपावर तोडगा अजूनही निघालेला नाही. मंत्र्यासोबत या प्रश्नांवर बैठक पार पडली मात्र निष्फळ ठरली. संप लांबल्यामुळे याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे ते संकटात सापडले आहेत. आज पुन्हा व्यापारी बैठक घेऊन चर्चा करून निर्णय घेणार आहेत.
कांदा प्रश्नावर काल मुंबईत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नसल्यानं व्यापारी आज देखील लिलावात सहभागी होणार नाहीत. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल आणि राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत बैठक पार पडली होती. कांदा व्यापाऱ्यांच्या काही मागण्यांमुळे गेल्या सात दिवसांपासून लिलाव बंद आहेत. त्यामुळे आज पुन्हा व्यापारी बैठक घेऊन चर्चा करून निर्णय घेणार आहेत.
