Lalbaghcha Raja

Lalbaghcha Raja : लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

798 0

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळावर (Lalbaghcha Raja) कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंडळाविरोधात काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लालबागचा राजा मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अवमान केल्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेले पितांबर लालबागच्या राजाला नेसवलं आहे. तसेच ती राजमुद्रा गणेश मूर्तीच्या पायावर ठेवल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आला आहे. यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

यंदाच्या वर्षी लालबागचा राजा मंडळाचे 90 वे वर्ष आहे. 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने मंडळाने यंदा रायगडाचा देखावा उभारला आहे. त्यामुळे मंडळाने गणेश मंडपात तशा प्रकारची सजावट केली आहे. यासोबत लालबागचा राजाची मूर्ती देखील तशीच सजवली आहे. मात्र लालबागचा राजाच्या चरणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रतिमा आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवप्रेमींकडून या गोष्टीला आक्षेप घेत निषेध नोंदवण्यात आला आहे.

याबाबत लालबागचा राजा मंडळाकडून अद्याप देखील कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण न आल्याने मराठी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लालबागच्या राजा मंडळाने समाज माध्यमाद्वारे किंवा मीडियाद्वारे तात्काळ या संदर्भात खुलासा करावा अशी मागणी देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. राजमुद्रा प्रकरणी बदल न केल्यास पुढील भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लवकरच जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide