मुंबई : सध्याचे कामगार मंत्री हे माथाडी कामगारांच्या, कामगार चळवळीच्या विरोधात आहेत असा घरचा आहेर माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी दिला आहे. सध्याच्या कामगार मंत्र्यांची भूमिका ही कामगारांच्या विरोधात असून त्यावर लवकरच चर्चा करण्यात येणार आहे.
नेमके काय म्हणाले नरेंद्र पाटील?
सध्याचे कामगार मंत्री हे माथाडी कामगारांच्या हिताच्या विरोधात आहेत, कामगार चळवळीच्या विरोधात आहेत. मूळ कामगार कायदा हा महाराष्ट्राचा आहे, त्याला बळ देण्याची आवश्यकता असताना त्यामध्ये बदल केला जात आहे. त्यामध्ये माथाडी कामगारांची अॅडव्हायजरी बंद करण्यात येईल आणि कारखान्यातील माथाडी कामगारांसाठी कायदा लागू केला जाणार नाही अशी तरतूद आहे. तसेच कामगारांची वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे.
मग 60 वर्षांनंतर कामगारांना तुम्ही पेन्शन देणार का? कामगारांनी कसं जगायचं हे तुम्ही ठरवणार का? त्यामुळे कामगार मंत्र्यांची भूमिका ही कामगारांच्या विरोधात आहे. यावर कामगार मंत्र्यांशी चर्चा करून तो कायदा चांगला करणार आणि वाईट गोष्टी बाहेर काढणार असे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील म्हणाले आहेत. आता सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.