पंढरपूर : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. एकीकडे हे आंदोलन शांतपणे चालले असताना दुसरीकडे मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेल्याचे पाहायला मिळत आहे. बीडमध्ये या आंदोलनाने मोठे हिंसक वळण घेतले आहे. यामुळे बीडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
यानंतर आता पंढरपुरातही मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांकडून एसटी बस पेटवून देण्यात आली आहे. पंढरपूर जवळच्या भंडीशेगाव येथे रात्री पिंपरी चिंचवड आगाराची बस पेटवण्यात आली आहे. आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
बीडमध्ये आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. आंदोलकांनी नेत्यांच्या घरावर दगडफेक केली, घर, कार्यालय पेटवून दिले. तर बस स्थानकातील ६० बसेसची तोडफोड करण्यात आली. यानंतर बीड शहरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव इंटरनेटही बंद करण्यात आलं असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.