Mantralaya

Maratha Reservation : मोठी बातमी! महाराष्ट्र सरकारचा कुणबी-मराठा आरक्षणाचा GR निघाला

2059 0

मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण सुरु आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे द्यावी. कारण मराठवाड्यातील काही जिल्हे निजाम संस्थेत होते. त्यावेळी शेती करणाऱ्या मराठा समाजाच्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जात होतं. पण नंतर हे संस्थान महाराष्ट्रात विलीन झालं तेव्हापासून मराठा समाजाला आरक्षण मिळत नाहीय. त्यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी मनोज जरांगे मागच्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत.

अखेर महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे यांच्या मागणीचा विचार करुन जीआर काढला आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने कालच याबाबत घोषणा केली होती. ज्यांकडे निजामकालीन कुणबी अशा नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर आता राज्य सरकारने याबाबतचा अधिकृत जीआर काढला आहे. याबाबत सरकारने मनोज जरांगे यांना पत्र पाठवलंय. या पत्रात सरकारने जीआरबाबत माहिती देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.

काय आहे GR मध्ये?
मराठा समाजातील द्या व्यक्तींनी मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या जात प्रमाणपत्राची मागणी केली असेल अशा व्यक्तींनी सादर केलेल्या निजामकालीन महसूली अभिलेखात, शैक्षणिक अभिलेखात तसेच अन्य अनुषंगिक समर्खनीय अभिलेखात जर त्यांच्या वंशावळीचा उल्लेख “कुणबी” असा असेल, तर अशा व्यक्तींनी सादर केलेल्या पुराव्यांची काटेकोर तपासणी करुन त्यांना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात येईल.

पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. या समितीत महसूल आणि वन विभागाचे अपर मुख्य सचिव, विधि आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त यांचा समावेश असणार आहे.

मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया
या GR नंतर मनोज जरांगे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते अजूनही आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील हे राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी आपलं एक शिष्टमंडळ मुंबईला पाठवण्यात येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!