अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या (Nilwande Dam) कालव्यात पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात येत आहे. त्याचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते आज पार पडला. या कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. म्हणाले बरं झालं आपलं शेतकऱ्यांचं सरकार आलं. अन्यथा निळवंडे धरणातून अद्याप पाणी सोडले गेले नसते. या राज्याचा मुख्यमंत्री एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात आहेत. मात्र, माझ्यावर टीका केली जाते की शेतकऱ्याचा मुलगा हेलिकॉप्टरमधून फिरतो. शेतकऱ्याचे मुलाने हेलिकॉप्टरमधून फिरू नये काय? असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी विरोधकांना लगावला आहे. यावेळी त्यांनी भिवंडीत एका शेतकऱ्याने स्वत:चे हेलिकॉप्टर घेतले असल्याचेसुद्धा सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, याचा अभिमान आहे. जेव्हा गावी जातो, तेव्हा मीही शेती आणि मातीत रमतो. मात्र, माझ्यावर हेलिकॉप्टरने फिरतो, अशी टीका विरोधक करतात. शेतकऱ्यांची प्रगती होऊ नये काय? त्यांच्या मुलाने हेलिकॉप्टरमधून फिरू नये काय? असे शिंदे यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्यासह मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते.