मर्चंट नेव्हीतील धुळ्याचा तरूण ओमानच्या समुद्रात बेपत्ता; कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार
मूळचा धुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेला आणि मर्चंट नेव्ही मध्ये कार्यरत असलेला यश देवरे हा तरुण ओमानच्या समुद्रात बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे यशच्या कुटुंबीयांना त्याच्याविषयीची कुठलीही समाधानकारक माहिती तो काम करत असलेल्या कंपनीकडून दिली जात नसल्याने यशचे कुटुंबीय चिंतातूर झाले आहेत. धुळे जिल्ह्यातल्या देऊर इथला रहिवासी यश देवरे हा तरुण मर्चंट नेव्हीमध्ये असून ठाण्यातील स्वराज सर्विस प्राइवेट लिमिटेडमध्ये तो ओएस पदावर कार्यरत आहे. तो कामादरम्यान सौदी अरेबियातील ओमान या ठिकाणी गेला होता. 28 जानेवारीला त्याचं कुटुंबीयांशी बोलणं झालं होतं. मात्र त्यानंतर अद्याप यशचा आपल्या कुटुंबीयांशी कुठलाही संपर्क झालेला नाही. त्यानंतर 29 जानेवारीला दुपारी दोन वाजता यश काम करत असलेल्या जहाज कंपनीने कुटुंबीयांशी संपर्क साधून यश हा चालत्या जहाजातून पाय घसरून पडून समुद्रात बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबीय सातत्याने संबंधित कंपनीशी संपर्क साधत राहिले मात्र कंपनीकडून उडवा उडवीची उत्तर देण्यात आली आणि आता काही दिवसांपासून कुटुंबीय ज्या क्रमांकावरून संपर्क साधत होते तो नंबरही बंद दाखवत आहे. त्यामुळे यशचे कुटुंबीय चिंताग्रस्त झालेत. आपल्या मुलासोबत नेमकं काय घडलं. याचा त्यांना थांगपत्ता नाही. गेल्या आठवड्यापासून देवरे कुटुंबीय, नातलग आणि निकटवर्तीय यशच्या शोधात आहेत.
