धुळे : धुळे शहरात दहशतवादी हल्ल्याच्या मॉक ड्रिल (Mock Drill) दरम्यान दहशतवादी म्हणून आलेल्या एका व्यक्तीला पालकांच्या रोषाचा सामना करावा लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये दहशतवादी हल्ला झाल्यावर कशी प्रतिक्रिया द्यायची याबद्दलचं प्रात्यक्षिक धुळे शहरातील स्वामीनारायण मंदिरामध्ये करण्यात आलं होतं.
यावेळेस प्रात्यक्षिकामुळे मंदिरात उपस्थित असलेले नागरिक चांगलेच घाबरले होते. लहान मुलांनी रडण्यास आणि जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. हे पाहून एका संतप्त पालकाने थेट दहशतवादी बनून आलेल्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. विशेष म्हणजे प्रात्यक्षिक सुरू असतानाच पालकाने त्या तरुणाला चोप दिला आहे.
मॉक ड्रिल दरम्यान दहशतवादी बनलेल्या तरुणाला पालकाने दिला चोप pic.twitter.com/XAlZOXJU8s
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) August 8, 2023
प्रात्यक्षिक सुरू असताना दहशतवाद्याला प्रत्यक्ष मारहाण होत असल्याचं पाहून सुरुवातीला पोलिसांच्यादेखील काहीच लक्षात आले नाही. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत संतप्त पालकाला बाजूला केले आणि हे मॉक ड्रिल पूर्ण केले. पालकांच्या या संतप्त प्रतिक्रियेमुळे मात्र उपस्थितांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. दुसरीकडे पोलिसांनी त्या पालकाची समजूत घालून त्याला बाजूला नेले. मात्र तोवर दहशतवादी बनलेल्या व्यक्तीचे मार खाल्याने कान चांगलेच लाल झाले होते.