धाराशिव : तुळजाभवानी मंदिर (Tuljabhavani Temple) संस्थानने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आता मंदिर प्रशासनाने नवीन अट घातली आहे. तुळजाभवानी मंदिरात आता अंगप्रदर्शन करणारे वेस्टर्न कपडे (Western clothes) घालणाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ सुरू करण्यात आली आहे. भारतीय संस्कृतीचा (Indian culture) हवाला देत मंदिर संस्थानाने हा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्णपीठ म्हणून ओळखले जाणाऱ्या तुळजाभवानीच्या मंदिरात पारंपारिक कपडे घालूनच प्रवेश मिळणार आहे. वेस्टर्न कपडे, अंग प्रदर्शन करणारे कपडे तसेच बरमुडा घालून भाविकांना प्रवेश करता येणार नाही. या आदेशाचे फलक आता मंदिर संस्थानाने मंदिर आणि आवाराच्या परिसरात लावण्यात आले आहेत. मंदिर संस्थांनाने घेतलेल्या या निर्णयाचे मंदिराच्या पुजाऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे तर भाविकांकडून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे
मंदिर संस्थानाने घेतलेल्या या निर्णयाला आतापर्यंत कोणी विरोध केला जरी नसला तरी निर्णयाची अंमलबजावणी करताना निर्माण होणाऱ्या त्रुटीवरून पुढील काळात या निर्णयावरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे.