Buldhana Royal Wedding

Buldhana Royal Wedding : बुलढाण्यातील शाही विवाहाची जोरदार चर्चा; माणसांसह पशुपक्षांचीदेखील बसली पंगत

569 0

बुलढाणा : आपल्या मुलीचे लग्न एकदम थाटामाटात पार पडावे अशी प्रत्येक बापाची अपेक्षा असते. आपल्या मुलीच्या लग्नात कसलीच कमी पडू नये, कोणीही उपाशी जाऊ नये असे प्रत्येक बापाला वाटत असते. असाच एक विवाह सोहळा बुलढाणामध्ये पार पडला. या विवाहाची चर्चा संपूर्ण पंचकृषीत रंगली आहे. चला तर मग जाणून घेऊया या लग्नाची विशेष गोष्ट…

बुलढाणा जिल्ह्यातील कोथळी गावातील प्रकाश सरोदे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या एकुलत्या एका मुलीचा विवाह काल पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी चक्क गावालगत पाच एकर शेतात मंडप बांधण्यात आला होता. तसेच या विवाह सोहळ्यासाठी गावाजवळील पाच गावातील सर्वांना या विवाहाचं निमंत्रण देण्यात आले होते. इतकंच काय तर सरोदे यांनी परिसरातील गुरे, पशू पक्ष्यांनादेखील जेवण दिले होते.

यासाठी गायींना दहा क्विंटल ढेप, गुरांना दहा ट्रॉली सुका चारा, परिसरातील श्वानाना पंगत इतकंच काय तर परिसरातील मुंग्या ही उपाशी राहू नये म्हणून मुंग्यांना दोन पोते साखर टाकण्यात आली. या विवाह सोहळ्यात कोणीही उपाशी राहू नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली होती. प्रकाश सरोदे यांनी आपल्या लाडक्या लेकीचा विवाह भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या अतुल दिवाणे याच्याशी केला आहे. या विवाह सोहळ्यात मुक्या प्राण्यांची विशेष काळजी घेतल्याने या सोहळ्याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.

Share This News
error: Content is protected !!