आपला महाराष्ट्र

Bhandara News : भंडाऱ्यात अंत्ययात्रेवर मधमाशांचा हल्ला; प्रेत सोडून नातेवाइकांनी काढला पळ

भंडारा : भंडारा जिल्ह्यात (Bhandara News) एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात अंत्ययात्रेवर मधमाशांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात अंत्ययात्रेसाठी आलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात तब्बल 200 लोक जखमी झाले आहेत. यानंतर नातेवाईकांनी मृतदेह रस्त्यावर सोडून पळ काढला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
भंडारा जिल्हाच्या तुमसर तालुक्यात सालई शिवारात अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शुभम भोयर याच्या अंत्ययात्रेत हा सगळा प्रकार घडला. अंत्ययात्रेत सामील झालेल्या नागरिकांवर बाम्हणी स्मशानघाटात मधमाशांनी अचानक प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला एवढा भीषण होता कि यामध्ये सुमारे 200 नागरिक जखमी झाले. अचानक मधमाशांनी केलेल्या हल्ल्यामुळे त्या ठिकाणी लोकांची मोठी धांदल उडाली. यावेळी मृतदेह घेऊन जाणाऱ्या नागरिकांनी मृतदेह खाली ठेवून नदीत उडी मारून मधमाशांच्या हल्ल्यापासून आपला जीव वाचवला.

शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास शुभम भोयर व मयूर भोयर या चुलत भावंडांची दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला खांबावर जाऊन आदळली. त्यात शुभम भोयर याचा रुग्णालयात नेताना वाटेत मृत्यू झाला होता. त्याची अंत्ययात्रा स्वगावी बाम्हणी येथे रविवारी दुपारच्या सुमारास वैनगंगा नदी काठावरील स्मशान घाटावर नेण्यात आली होती. त्यावेळी अचानक मधमाशांनी अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे 200 नागरिक जखमी झाले आहेत. यादरम्यान काही युवकांनी हिम्मत करून शुभमचे प्रेत तिरडीसह चितेजवळ आणलं आणि त्यानंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.