शेअर बाजार:क्रिप्टो करन्सी मार्केट गेल्या आठ महिन्यांत 2 लाख कोटींपेक्षा अधिक प्रमाणात घटले आहे. बिटकॉइन आणि तिची जवळची प्रतिस्पर्धी असलेली इथरियम या दोन्ही करन्सींचे बाजार भांडवल अनुक्रमे 400 अब्ज आणि 140 अब्ज एवढे घसरले आहे. त्यांच्या सर्वोत्तम मूल्याच्या 70 टक्क्यांनी खाली घसरलेले हे मूल्य आहे.
तज्ज्ञांच्या मते, क्रिप्टो करन्सीच्या किमतीतील घसरण महागाईच्या दबावामुळे होते. युक्रेन युद्ध, पुरवठा साखळीतील अडथळे, अन्नसुरक्षेचा प्रश्न, कोविडची जागतिक महामारी आणि तिच्याशी झालेला संघर्ष, गेल्या चार दशकांमधील अमेरिकेतील सर्वाधिक महागाई, वाढती बेरोजगारी यांसारख्या समस्यांशी बहुतांश देश झुंज देत आहेत. परिणामी सर्व बाजूंनी आलेल्या अडथळ्यांनी जागतिक आर्थिक वाढ खुंटत आहे. फेडरल रिझर्व्हने जारी केलेल्या चलनविषयक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी अमेरिकी वित्तीय बाजार प्रयत्न करीत आहे. त्यामुळे महागाईचा धोका वाढला आहे. त्याचा थेट परिणाम शेअर बाजार आणि क्रिप्टो करन्सीच्या मूल्यावर होत आहे.
काही संस्थांनी बिटकॉइन हे चलन या आशेने विकत घेतले, की ते शेअर बाजार आणि बाँड्समधील घसरणीची भरपाई करेल. परंतु विश्वास तर दूरच; अलीकडील ट्रेन्ड असे सूचित करतात, की काही क्रिप्टो मालमत्ता व्यापक बाजाराच्या ट्रेंडशी अधिक संरेखित झाल्या आहेत. उदाहरणार्थ आठ मे रोजी बिटकॉइन आणि इथरियम हे प्रसिद्ध क्रिप्टो चलन तसेच टेस्ला, अॅपल, मायक्रोसॉफ्ट आदी मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या किमतीतही घसरण झाली. साहजिकच जागतिक मंदीपासून क्रिप्टो चलन दूर राहील, हा विश्वास व्यर्थ ठरला आहे.
मे महिन्यात यूएसटी हे टोपणनाव असलेले टेरायूएसडी हे चलन कोसळल्याने क्रिप्टो मार्केटला धक्का बसला आहे. टेरायूएसडी हे विकेंद्रित अल्गोरिदमवर आधारित स्टेबलकॉइन आहे. मिन्ट आणि बर्न पद्धत वापरून एक यूएसटी चे मूल्य एक डॉलरवर कायम राखणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. यूएसटीचे मूल्य एक डॉलरवर राखण्यासाठी टेराचे मूळ चलन असलेल्या लुनाचा वापर केला जातो. बाजारातील अस्थिरता आणि एकूणच घसरणीमुळे स्टेबलकॉइन संतुलित ठेवण्यासाठीचे प्रयत्न व्यर्थ ठरले. या प्रक्रियेचे प्रतिबिंब म्हणजे जेव्हा यूएसटीची मागणी कमी होते, तेव्हा लुनावर विक्रीचा दबाव वाढतो. मे महिन्यात जेव्हा दबाव वाढला तेव्हा दोन्हीची किंमत शून्याच्या जवळपास पोहोचली. घसरण होण्यापूर्वी टेरायूएसटीला सुरक्षित क्रिप्टो चलन मानले जात असे. त्यामुळे गुंतवणूकदारांना 19.5 टक्के नफा मिळत असे. 13 जून रोजी क्रिप्टो कर्ज देणार्या सेल्सिअस या संस्थेने बाजारातील बिकट परिस्थितीचा हवाला देत ग्राहकांच्या क्रिप्टो मालमत्ता काढून घेण्यावर बंदी घातली आहे.
क्रिप्टो चलन उद्योगातील मंदीचा थेट परिणाम रोजगार कपातीच्या रूपात समोर आला आहे. कॉइनबेसने नियुक्तीवर बंदी घातली आहे. नोकरीच्या ऑफर्स रद्द केल्या आहेत. ब्लॉकफीने त्यांच्या 20 टक्के कर्मचार्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. क्रिप्टो डॉट कॉम, जेमिनी यांसारख्या कंपन्याही टाळेबंदीच्या तयारीत आहेत. एकूणच हजारो नोकर्या धोक्यात आल्या आहेत.
