नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दोन हजार रुपयांच्या नोटा (2000 Notes) बदलण्याची मुदत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून वाढण्यात आली आहे. उद्यापासून 2000 रुपयांच्या नोटा व्यवहारात वापरता येणार नाहीत. बँकेत नोटा जमा करण्याची मुदत आरबीआयने वाढवली आहे. आज रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे. आता, नागरिकांना त्यांच्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबर 2023 पर्यंत 96 टक्के 2000 रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या 3.56 लाख कोटी मूल्याच्या नोटा चलनात होत्या. त्यानंतर आतापर्यंत 3.42 लाख कोटी रुपये मूल्य असणाऱ्या नोटा आरबीआयकडे परत आल्या आहेत. ज्यांनी अजूनही 2000 रुपयांच्या नोटा बदलल्या नसतील त्यांना आता 7 ऑक्टोबरपर्यंत नोटा बदलता येणार आहे. एकाच वेळी कमाल 20 हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत असे आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
19 मे 2023 रोजी घेतला होता RBI ने निर्णय
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे 2023 रोजी चलनातून 2000 रुपयांच्या नोटा बाद करण्याची घोषणा केली होती. यासाठी बँकेने लोकांना 4 महिन्यांची मुदत दिली होती. जेणेकरून ते त्यांच्या बँकेत किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या जुन्या नोटा सहज बदलू शकतील. त्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 रोजी संपत होती. मात्र, आरबीआयने आढावा घेत नोटा बदलून देण्यासाठी मुदत वाढवली आहे.