वेदांता फॉक्सकॉन नंतर आता ‘फोन पे’ देखील जाणार महाराष्ट्र बाहेर
महाराष्ट्र : वेदांता फॉक्सकॉनने महाराष्ट्रातून काढता पाय घेऊन गुजरातमध्ये आपले बस्तान बांधले. यावरून महाराष्ट्रामध्ये राजकीय गोटामध्ये वादंग सुरू असतानाच आता फोन पेने देखील महाराष्ट्रातून काढता पाय घेणार असल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान फोन पे महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये स्थलांतरित होत असल्याचे समजते आहे. कंपनीने नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यात बदलण्यासाठी कंपनी कायदा 2012 च्या कलम 13 अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे. यासंदर्भात कंपनी मेमोऱ्यांडम ऑफ असोसिएशनमध्ये फेरफार करण्यासंदर्भात 16 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये हा ठराव मंजूर करण्यात आला अशी माहिती कंपनीने दिली आहे.
एकंदरीतच वेदांत फॉक्सकॉन ही कंपनी जर महाराष्ट्रात सुरू झाली असती तर सुमारे दीड लाख बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाला असता. पण आता पुन्हा एकदा ती आशा मावळली असताना फोन पेने देखील महाराष्ट्रातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आगीत तेल ओतल्यासारखे होणार आहे.
