Educational : ‘MPSC’ सुधारीत परीक्षा योजनेनुसार राज्यसेवेचा नवा अभ्यासक्रम जाहीर

111 0

मुंबई : बदललेल्या परीक्षा योजनेनुसार राज्य सेवा परीक्षेचा नवा अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गुरूवारी जाहीर केला. त्यानुसार पूर्व परीक्षेत निर्णय क्षमता आणि प्रश्नांची सोडवणूक या संदर्भातील प्रश्न वगळता अन्य प्रश्नांसाठी नकारात्मक गुणदान पद्धत लागू करण्यात आली असून, मुख्य परीक्षेसाठी एकूण २६ विषयांतून उमेदवारांना त्यांच्या आवडीच्या एका विषयाची निवड करता येईल.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेच्या धर्तीवर राज्य सेवा परीक्षेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याचा निर्णय एमपीएससीने काही दिवसांपूर्वी घेतला. त्यात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची परीक्षा पद्धत बंद करून वर्णनात्मक परीक्षा पद्धत लागू करण्याचे आणि नवी परीक्षा पद्धत २०२३पासून लागू करण्यात येणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले होते. त्यामुळे नवा अभ्यासक्रम कधी जाहीर होणार याची उमेदवारांना प्रतीक्षा होती. या पार्श्वभूमीवर एमपीएससीने नवा अभ्यासक्रम परिपत्रकाद्वारे जाहीर केला. त्यात विषयनिहाय तपशील देण्यात आला आहे.

पूर्व परीक्षेसाठी सामान्य अध्ययन भाग एक आणि सामान्य अध्ययन भाग दोन (सी सॅट) हे दोन विषय असतील. त्यातील सी सॅट हा विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाईल. तर मुख्य परीक्षेसाठीच्या वैकल्पिक विषयांमध्ये कृषि, पशुसंवर्धन आणि पशु वैद्यकशास्त्र, मानवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकी, वाणिज्य आणि वित्त, अर्थशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी, भूगोल, भूशास्त्र, इतिहास, कायदा, व्यवस्थापन, मराठी साहित्य, यंत्र अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, तत्त्वज्ञान, भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, मानसशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, संख्याशास्त्र, प्राणिशास्त्र या २६ विषयांचा समावेश आहे. या विषयांतून उमेदवारांना एक विषय निवडता येईल. त्याचे दोन पेपर मुख्य परीक्षेवेळी द्यावे लागतील.

या पूर्वीच्या अभ्यासक्रमाचे फायदे-तोटे लक्षात घेऊन अधिक गुणवत्ताधारक उमेदवार निवडले जावेत, तसेच एकाच अभ्यासाद्वारे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि एमपीएससी यांची तयारी करता येईल अशा पद्धतीने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यसेवा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनाही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणे सोयीचे ठरेल.

– सुनील अवताडे, सहसचिव, एमपीएससी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!