जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon News) एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये कामाच्या पहिल्याच दिवशी जळगाव एमआयडीसीत प्लास्टिक कंपनीत विजेचा धक्का लागून एका तरुण परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेत जळगाव जिल्ह्यातील अन्य एक तरुण देखील गंभीर जखमी झाला आहे. 16 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास हि घटना घडली आहे. राहुल दरबार राठोड (22, मध्यप्रदेश, ह.मु. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर जीवन गजानन चौधरी (रा. जामनेर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
काय घडले नेमके?
मध्यप्रदेशातील मूळ रहिवासी असलेला राहुल राठोड हा तरुण आई-वडील आणि लहान भाऊ यांच्यासोबत जळगाव शहरातील फातीमा नगरात राहत होता. एमआयडीसीतील एका प्लास्टिक कंपनीत कामाचा पहिला दिवस असल्याने राहुल आज सोमवारी सकाळी 8 वाजता कामावर हजर झाला. यावेळी काम करीत असताना त्याला विजेचा धक्का (शॉक) लागला.त्याच्यासोबत असलेल्या जीवन गजानन चौधरी याला देखील विजेचा धक्का लागला. यानंतर बाकीच्या कामगारांनी तातडीने या दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी राहुलला मृत घोषित केले. तर जखमी जीवन याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृत राहुल घरातील कर्ता व्यक्ती होता. त्याच्या मृत्यूची वार्ता समजताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात आक्रोश केला. कामाच्या पहिल्याच दिवशी राहुलचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत राहुलच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे.