Thane News

Thane News : गुन्हा करण्यासाठी शहरात आला; मात्र ‘ती’ चूक पडली महागात आणि अडकला पोलिसांच्या जाळ्यात

576 0

ठाणे : पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस बाळगून उल्हासनगर येथील (Thane News) शांतीनगर भागातील जगदंबा मंदिर येथे गंभीर गुन्हा करण्यासाठी आलेल्या एका तरूणाला कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून शनिवारी दुपारी सापळा रचून अटक करण्यात आली. दुर्गेशकुमार कैलास वारे (22) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव असून तो म्हारळ गावातील रहिवासी आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांना उल्हासनगरमधील शांतीनगर इथे असलेल्या जगदंबा माता मंदिराजवळ एक इसम शस्त्र घेऊन येऊन गंभीर गुन्हा करण्यासाठी येणार आहे, अशी गुप्त माहिती मिळाली होती. शनिवारी दुपारी वरिष्ठ निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इसम येणाऱ्या ठिकाणी हवालदार प्रशांत वानखेडे, अनुप कामत, विश्वास माने, गोरख शेकडे, बापूराव जाधव यांनी सापळा रचला.

ठरल्या वेळेत एक इसम शांतीनगर भागात दुपारच्या वेळेत आला. तो त्या भागात येऊन घुटमळू लागल्याने हवालदार कामत यांनी त्या इसमाला या भागात काय करतो, अशी विचारणा केली. यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर तो तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. हवालदार कामत यांनी इशारा करताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळून 30 हजार रूपये किमतीचे पिस्तूल आणि एक हजार रूपये किमतीची चार जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. त्याच्यावर उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!