यवतमाळ : यवतमाळमधून (Yavatmal Murder) एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील कळंबमधील तिरझडा पारधी बेड्यावर ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत घरघुती वादातून जावयाने सासरा, दोन मेहुणे आणि बायकोची हत्या केली. तर त्याची सासू जखमी झाली असून त्यांच्यावर यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.
काय घडले नेमके?
जावयाने केलेल्या हल्ल्यात सासरा पंडित घोसले, मेहुणा ज्ञानेश्वर घोसले आणि सुनील घोसले, बायको रेखा गोविंद पवार अशी मृतांची नवे आहेत. सासू रुखमा पंडित घोसले गंभीर जखमी असून त्यांच्यावर यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. गोविंद विरचंद पवार असे आरोपी जावयाचे नाव आहे. तो काही महिन्यांपूर्वी पत्नी रेखा सोबत सासुरवाडीत राहत होता. त्याला येथे सतत अपमानास्पद वागणूक मिळत होती.
यामुळेच दुखावलेल्या गोविंदने मंगळवारी मध्यरात्री संपूर्ण घरावरच सूड उगवला. तिरझडा गावात घरी झोपलेल्या पत्नी आणि मेहुण्याची हत्या केली. नंतर शेतात झोपलेल्या सासरा आणि दुसरा मेहुण्यावर हल्ला केला. यावेळी सासू थोडक्यात बचावली. मात्र तिची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.