सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिलला स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यासाठी त्यांना एका महिलेने प्रवृत्त केल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलं होतं. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू करत या महिलेला अटक केली आहे. तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या असून त्यानंतर आता ही आत्महत्या नेमकी या महिलेमुळे झाली की गृह कलहांमुळे झाली असे प्रश्न उपस्थित होत आहे.
मनीषा मुसळे-माने या महिलेच्या मानसिक त्रासामुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहिलंय. सदर महिला ही वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये कर्मचारी होती. गेल्या 17 वर्षांपासून ती हॉस्पिटलमध्ये कार्यरत होती. कामाच्या माध्यमातून तिने वळसंगकर आणि त्यांच्या कुटुंबियांवर प्रभाव पाडला. त्यामुळेच वळसंगकर यांनीच तिला प्रशासकीय प्रमुख केले. मनिषा यांचे वळसंगकर यांच्याशी खूप चांगले संबंध असल्यामुळे त्यांना डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मानसकन्या म्हटलं जाऊ लागलं. इतक्या वर्षांत वळसंगकर कुटुंबीयांनी तिच्याबद्दल कधीच तक्रार केली नाही. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मनीषा यांची हॉस्पिटलमधील अरेरावी वाढली. स्वतःचं हॉस्पिटल असल्यासारखं त्या वागत होत्या, त्यामुळेच अशा काही कारणांमुळे त्यांना कामावरून कमी करण्यात आलं. त्यानंतरच या महिलेने वळसंगकर यांना मानसिक त्रास दिल्याचं बोललं जात आहे. तर ही महिला रडत रडत वळसंगकर यांच्या अंत्ययात्रेला आल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
सुरुवातीपासून या प्रकरणात केवळ या महिलेचाच हात असल्याची चर्चा होती. मात्र आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. या महिलेच्या वकिलांनी वळसंगकर कुटुंबीयांवर गंभीर आरोप करत अनेक धक्कादायक दावे केले आहेत. तर त्यांच्या आरोपांवरून वळसंगकर यांच्या आत्महत्या मागे नैराश्य आणि गृहकलह हे कारण असल्याचं म्हटलं जात आहे.
वळसंकर यांच्या कुटुंबातील सदस्यांनीच त्यांना हॉस्पिटलच्या आर्थिक व्यवहारातून बेदखल केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळेच ते गेल्या वर्षभरापासून मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती पुढे येत आहे. गृहकलहामुळे ते अतिशय त्रस्त झाले होते, नैराश्यात गेले होते. कुटुंबीय आणि डॉक्टरांमध्ये सारं काही अलबेल नसल्याचे प्रसंग त्यांचे निकटवर्तीय खासगीत सांगत आहेत. आत्महत्येच्या दिवशीही ते आपल्या पत्नी आणि मुली सोबत घरात बोलत बसलेले होते. मात्र अचानक ते बाथरूम मध्ये गेले. आणि त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्यादिवशी घरात नेमकं काय घडलं होतं ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
वळसंगकर यांच्या गृहकलहातील अनेक गोपनीय गोष्टी मनीषा यांना माहीत होत्या. त्या संदर्भात मनीषा यांच्या मोबाईलमध्ये काही मेसेज व ऑडिओ क्लिप असल्याचा दावा त्यांनी स्वत: त्यांच्या वकिलांकडे केला आहे. पण पोलिसांनी मोबाईल जप्त केल्यामुळे हे पुरावे अजून हाती लागलेले नाहीत असं या महिलेच्या वकिलांनी सांगितलं. तर दुसरीकडे गृहकलह लपवण्यासाठीच या महिलेला या प्रकरणात गोवल जात असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. त्यामुळे वळसंगकर यांचे त्यांच्या आत्महत्या मागे ही महिला आहे की कुटुंबीय आहेत ? याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
RAVINDRA DHANGEKAR JOIN SHIVSENA| काय म्हणता पुणेकर; शिवसेनेत गेले रवींद्र धंगेकर