नाही नाही म्हणता अखेर रवींद्र धंगेकर (RAVINDRA DHANGEKAR) यांनी काँग्रेसचा हाताचा पंजा सोडून शिवसेनेत (SHIVSENA) प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी उद्योग व मराठी भाषा उदय सामंत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थितीत होते.
कसा आहे रविंद्र धंगेकर यांचा राजकीय प्रवास
आधी शिवसेना त्यानंतर मनसैनिक आणि काँग्रेस असा त्रिकोणी राजकीय प्रवास करणारे पण सामान्यांचे नेते अशी ओळख रवींद्र धंगेकर यांची आहे.
रवींद्र धंगेकर हे 25 वर्ष कसबा पेठेतील नगरसेवक होते. त्यामुळे लोकांमध्ये त्यांचा कायम वावर असतो. हाक दिली तेव्हा मदतीला धावून जाणारे नेते, अशी त्यांची ख्याती आहे धंगेकर यांनी पाच वेळ नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली. त्यापैकी दोन वेळा शिवसेना तर दोन वेळा मनसेचं प्रतिनिधित्व केलं 2009 मध्ये धंगेकर यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या गिरीश बापट यांच्याविरोधात लढवली होती मात्र अल्प मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यावेळी ते मनसेत होते. राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू होते. 2014 मध्येही रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या लाटेपुढे धंगेकर यांचा टिकाव लागला नाही. मात्र निवडणुकीत त्यांनी कडवी झुंज दिली. 2017 मध्ये धंगेकर यांनी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि याच वर्षी झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी पुणे शहरातील भाजपाचे दिग्गज नेते गणेश बिडकर यांना पराभूत करून पुणे महानगरपालिकेत एन्ट्री केली. यामुळं जायंट किलर ही ओळख धंगेकर यांना मिळाली. कसब्याच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांचा पराभव करत रवींद्र धंगेकर कसब्यातून आमदार म्हणून विजयी झाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली मात्र त्यात त्यांचा पराभव झाला त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही हेमंत रासने यांच्याकडून रवींद्र धंगेकरांना पराभव स्वीकारावा लागला
काँग्रेसचा हात सोडून पुन्हा शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणाऱ्या रवींद्र धंगेकर यांना आगामी काळात कोणती जबाबदारी दिली जाते. हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
विश्लेषण : कसबा,चिंचवडची पोटनिवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपासाठी का आहे प्रतिष्ठेची ?