नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पतीचे अनैतिक संबंध असल्याने आणि पतीकडून होत असलेल्या जाचास कंटाळून विषारी औषध पिले. यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी महिलेच्या माहेरच्या कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून पती, सासू आणि पतीची प्रेयसी यांच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता गोठे (वय 29) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे नाशिकच्या सिडको परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मृत अनिता हिच्या पतीचे बाहेर अनैतिक संबंध होते. यामुळे पती वारंवार तिला मारहाण करून धमकी देत होता. तसेच तिला माहेरच्यांकडून घर खर्चासाठी पैसे आणण्यासाठी तगादाही लावत होता. अखेर हा त्रास असह्य झाल्याने अनिताने राहत्या घरात उंदीर मारण्याचे विषारी औषध सेवन केले. उपचारादरम्यान पत्नी अनिता गोठे हिचा मृत्यू झाल्याने तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी पती पंकज एकनाथ गोठे, सासू बेबी एकनाथ गोठे (रा. विशाल पार्क, माऊली लॉन्स, डीजीपी नगर) तसेच पंकजची प्रेयसी यांच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मयत अनिता गोठे यांचा भाऊ नितीन सीताराम निर्भवणे यांनी अंबड पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली आहे. दरम्यान, आत्महत्या केलेल्या महिलेला 2014 पासून ते 2023 पर्यंत त्रास दिला जात होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पतीच्या अज्ञात प्रेयसी विरोधात देखील तक्रार देण्यात आली असून तिच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.