Hingoli News

Hingoli News : दोघां भावांच्या मृत्यूने हिंगोली हळहळलं ! जिवंतपणी हातात हात घालून फिरले; मरतानादेखील एकमेकांची साथ नाही सोडली

614 0

हिंगोली : हिंगोलीमधून (Hingoli News) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. कळमनुरी तालुक्यामध्ये असलेल्या शेवाळा या ठिकाणी 5 वर्षांच्या 2 चिमुकल्यांचा नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
शिवराज संदीप सूर्यवंशी (5) आणि स्वराज दीपक सूर्यवंशी (5) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. हि दोघे नात्याने एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. घटनेच्या दिवशी हे दोघेजण गावातील हनुमान मंदिराकडे असलेल्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते. आपल्या आईसोबत देवीच्या दर्शनासाठी ही दोन्ही चिमुकले गेल्यावर रोजच्या प्रमाणे आईला सांगितले की, आम्ही काही वेळ येथे खेळतो. नंतर परत घराकडे येतो असे म्हणून ही मुले खेळण्यासाठी मंदिराच्या परिसरात गेली. नंतर काही वेळाने जवळच असलेल्या कयाधू नदी पात्राकडे खेळत गेली. नदीवर खेळताना त्या ठिकाणी नदीच्या पाण्यात पाय घसरून पडल्यामुळे दोघांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.

सकाळी 11 वाजण्याच्या सुमारापासून स्वराज आणि शिवराज नात्याने चुलत भाऊ असलेले दोघेजण उशिरापर्यंत घराकडे आले नसल्याने आई-वडिलांनी आणि गावातील नागरिकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही. यानंतर कुटुंबीयांनी बाळापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्री सात वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी व गावकऱ्यांनी मिळून नदीच्या परिसरात पाहणी केली असता त्या ठिकाणी नदीपात्रात दोघांचे मृतदेह आढळून आले. या दोघांचेही मृतदेह बघून कुटुंबाने हंबरडा फोडला. या घटनेमुळे संपूर्ण गावासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!