drowning hands

Bhiwandi News : तळ्यात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

588 0

भिवंडी : भिवंडीमधून (Bhiwandi News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये मित्रांसोबत तळ्यात पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा तलावाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी उशिरा भिवंडी तालुक्यातील धामणगाव या ठिकाणी ही घटना घडली आहे. मृत मुलांमध्ये एक आठ वर्षांचा मुलगा तर एका बारा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. वसीम मलिक (वय 8 रा. फातिमा नगर) व अंजुम फत्ते मो.रफिक (वय 12 रा.धामणगाव धापशी पाडा) अशी मृत चिमुरड्यांची नावं आहेत.

काय घडले नेमके?
भिवंडी शहरातील फातिमा नगर येथील आठ वर्षांचा वसीम हा तालुक्यातील वडपा धामणगाव धापशीपाडा येथे आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. यावेळी वसीम आपली नातेवाईक असलेली बारा वर्षांची मुलगी अंजुम व इतर दोन साथीदारांसह वडपा धामणगाव येथे साचलेल्या ओव्हळाच्या पाण्यात पोहायला गेला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं ते दोघेही पाण्यात बुडाले.

बाजूला उभ्या असलेल्या दोन साथीदारांनी आरडाओरड केल्यानं तेथून जाणाऱ्या एका वाहन चालकाने मुलांचा आवाज ऐकून पाण्यातून मुलांना बाहेर काढलं. त्यानं तातडीनं या मुलांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच त्या दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!