22 दिवसांपासून ज्या वाल्मीक कराडला पकडण्याची सर्व नेते, पोलीस आणि सर्वसामान्य जनता ही वाट पाहत होते, तोच वाल्मीक कराड (valmik karad) आज स्वतः सीआयडी (CID) समोर शरण आला. मात्र शरण येतानाही तो एकटा न येता समर्थकांची टोळी घेऊन आला. त्याच्याबरोबर त्याच्या गाडीत एक नगरसेवक देखील होते. ज्यांनी वाल्मीक कराड बद्दल महत्त्वाची माहिती माध्यमांना दिली.
9 डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर दोन कोटीच्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मीक कराडचा या हत्यात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर वाल्मीक कराड हा फरार झाला. आधी बीडचे पोलीस आणि नंतर सीआयडीचं पथक वाल्मीक कराडचा शोध घेत होतं. हा शोध अखेर थांबला कारण वाल्मीक कराड स्वतः सीआयडी ला शरण आला. वाल्मीक कराड हा पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झाला. या गाडीचा नंबर एमएच 23 बीजी 2231 होता. ही गाडी धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याच्या पत्नीच्या नावावर आहे. याच गाडीतून वाल्मीक कराडसह एक नगरसेवक देखील आले होते.
ते नगरसेवक कोण ?
वाल्मीक कराड यांच्याबरोबर गाडीत दोन व्यक्ती होत्या. त्यातील एकाचं नाव शरद मुंडे आहे. ते नगरसेवक आहेत. तर दुसऱ्या व्यक्तीचं नाव समोर आलेले नाही. याच शरद मुंडे यांना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना ते म्हणाले, ‘वाल्मिक कराडवरील आरोप खोटे आहेत. मी परवापासून कराडांसोबत आहे. परवापासून कराड पुण्यातच आहेत. आणि वाल्मिक अण्णा हे स्वत:हून इथे सरेंडर होण्यासाठी आलेत. ते दोषी आहेत म्हणून लपले नव्हते तर खोट्या गुन्ह्यांमध्ये कोणालाही भीती वाटते. तशीच वाल्मिक अण्णाला भीती वाटली, म्हणून ते लपले.’