संतोष देशमुख हत्या प्रकरण: एसआयटी ॲक्शन मोडवर; 24 तासात पहिल्या संशयिताला घेतलं ताब्यात

बीडचे किस्से, कारनामे… मिर्जापूरही पडेल मागे!

7074 0

‘Guns ki madad se darr nhi badhana hai, darr ki maddad se guns!’

हा डायलॉग आहे मिर्जापूर वेब सीरिजमधला… पण तो ही
आता मागं पडलाय. महाराष्ट्रातील बीड गुन्हेगारीच्या बाबतीत मिर्जापूरलाही मागं सारेल की काय, असं वाटू लागलंय.

दिवाळीत फटाक्यांच्या टिकल्या वाजवल्याप्रमाणं इथं पिस्तूलातून हवेत गोळीबार होतात… बापाची पिस्तुल, लेकाच्या कमरेला! हा कसला माज, इथं कुणाचाच कुणाला उरला नाही धाक! चॉकलेट, गोळ्या वाटल्याप्रमाणं वाटण्यात येते इथं पिस्तुलांची खैरात!

बीडमधे पिस्तुलांचं थैमान? 01हजार 122 जणांकडं शस्त्र परवाने? कुणाच्या राजकीय वरदहस्ताने? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून पर्दाफाश; तेव्हा कुठं आली पोलिसांना जाग! हवेत गोळीबार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; बीडच्या नव्या एसपींनी दाखवला खाकी वर्दीचा धाक!

2012 नंतर बरोबर 12 वर्षांनी उजाडलं साल 2024! पण बीडच्या जमिनीत पेरल्या गेलेल्या गुन्हेगारीच्या बिजानं आता मुळं धरली होती. अपहरण, खून, अत्याचार, चोऱ्यामाऱ्या, खंडणी, हाणामाऱ्या या गुन्ह्यांनी डोकं वर काढलं होतं. जीव मुठीत घेऊन जगायचं नाहीतर गाव सोडून निघायचं एवढंच काय ते गोरगरिबांच्या हातात उरलं होतं. आधीच दुष्काळ, त्यात गुन्हेगारीचा कर्दनकाळ! हाताला काम नसलेली पोरं गुन्हेगारीकडं वळली आणि कुण्या लुंग्यासुंग्याच्या सांगण्यावरून हाणामारी, हप्तावसुली करू लागली. जिल्ह्यात कुठं नवा उद्योग आला की यांचा उद्योग सुरू! म्होरक्यानं सांगायचं नि या पोरांनी ऐकायचं… मारा, झोडा, ठोका पण मिळवून आणा पैका! मग काय, उद्योगाच्या ठिकाणी जायचं, अधिकारी-कर्मचाऱ्यांना दरडंवायचं, पळवून नेऊन मारायचं आणि खंडणीच्या नावाखाली पैसे घेऊन यायचं हा त्यांचा रोजचाच धंदा बनला. असाच एक प्रकल्प मस्साजोग गावात आला आणि..

तारीख होती 9 डिसेंबर 2024! मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचं अशाच काही गावगुंडांनी आधी अपहरण केलं, त्यांना मार मार मारलं, नंतर ठार मारून फेकून दिलं. संतोष देशमुखांचं काळं-निळं पडलेलं शरीर आणि त्यांच्या शरीरावर झालेल्या जखमा पाहून केवळ बीडच नव्हे तर सारा महाराष्ट्र हादरला, हळहळला, विव्हळला! महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या हत्येची चर्चा सुरू झाली पण तिचा विस्फोट विधानसभेच्या अधिवेशनात झाला… बीड जिल्ह्यातील आमदारांनी संतोष देशमुख यांच्या अपहरणापासून हत्येपर्यंतचा संपूर्ण घटनापट मांडला आणि ते ऐकून सारा महाराष्ट्र रडला!

संतोष देशमुख यांच्या मृत्यूसमयीची किंचाळी महाराष्ट्राच्या सभागृहातून थेट दिल्लीच्या सभागृहापर्यंत जाऊन पोचली. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा घटनाक्रम लोकसभेत मांडला आणि ते ऐकून सभागृहाचा प्रत्येक प्रतिनिधी स्तब्ध झाला.

तोपर्यंत इकडं बीड पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू झाला होता. संतोष देशमुख हत्येप्रकरणी आणि अवादा एनर्जी कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला धमकावून त्याच्याकडं 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. अखेर संतोष देशमुख हत्येप्रकरणी पोलिसांनी 07 जणांवर गुन्हा दाखल केला आणि प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार, विष्णू चाटे या 04 जणांना अटक केली. यातील सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे 03 जण मात्र फरार आहेत. तिकडं खंडणीप्रकरणी 03 जणांवर गुन्हा दाखल झाला. हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला अटक करण्यात आली. मात्र हत्येसह खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेला सुदर्शन घुले आणि खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड हे दोघेजण अद्यापही फरार आहेत. खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका आरोपीचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात हात असल्याचा संशय आहे. खंडणी आणि हत्या या दोन्ही गुन्ह्यात नाव घेतलं जाणारा हा आरोपी नेमका आहे तरी कोण? हा आरोपी म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्याच्या नावाची चर्चा सुरू आहे तो वाल्मिक कराड! महाराष्ट्राचे विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचा समजला जाणारा गृहस्थ म्हणजे वाल्मिक कराड! ‘ज्याच्याशिवाय धनुभाऊचं पानही हलत नाही,’ असा उल्लेख पंकजा मुंडे यांनी ज्याच्या बाबतीत केला होता तो वाल्मिक कराड!

वाल्मिक कराड याचे किस्से, कारनामे ऐकून सारा महाराष्ट्र हादरला. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना त्रास देणं, खोट्या-नाट्या पोलीस केसेस दाखल करणं, जमिनी हडप करणं, पोलीस यंत्रणेचा गैरवापर करणं, प्रशासकीय व्यवस्थेत हस्तक्षेप करणं आदी गोष्टी त्याच्या डाव्या हातचा मळ होऊन बसला होता. 12 डिसेंबरला खंडणीचा गुन्हा दाखल होऊन आज 13 दिवस लोटले तरीही त्याला अटक होत नाही? का? तो कुणाचा तरी राइट हॅन्ड आहे म्हणून? त्याच्यावर कुणाचा तरी राजकीय वरदहस्त आहे म्हणून? की या मोकाट कराडच्या दहशतीपुढं पोलीस यंत्रणाही हतबल आहे म्हणून?

वाल्याचा वाल्मिकी होतो हे आपण ऐकलं होतं, वाचलं होतं पण
आज वाल्मिकीचा वाल्या झाल्याचं सारा महाराष्ट्र पाहातोय. अशा वाल्याला अटक करून त्याच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार याकडं अवघा महाराष्ट्र डोळे लावून बसलाय. हा वाल्मिक कराड कुणाचा तरी आका असला तरी या आकाचाही कुणी आका आहे, असा सूर बीडसह साऱ्या महाराष्ट्रातून उमटतो आहे. या गुन्ह्यांमागचा मास्टरमाइंड कुणीही असो, त्याला अटक ही व्हायलाच हवी, तर आणि तरच आजचं बीड दहशतमुक्त होईल, मोकळा श्वास घेईल… आणि राहाता राहिली गोष्ट मिर्जापूरची… बीडचा बिहार झालाय, गुन्हेगारीच्या बाबतीत बीडनं मिर्जापूरलाही मागं टाकलंय, असं सर्वत्र बोललं जातंय. पण, हे ऐकताना कसंसच होतं. संत-महंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीडला आज कुणी तरी गुन्हेगारांची भूमी म्हणतंय हे ऐकून दुःख होतं. Top News मराठीच्या माध्यमातून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील तमाम लोकप्रतिनिधींना आमची हात जोडून विनंती आहे… बीडचं गतवैभव बीडला परत मिळवून द्या, बीडला दहशतमुक्त करा, वाल्मिक कराडसारख्या प्रवृत्तीला पोसू नका, या प्रवृत्तीला वेळीच ठेचून काढा आणि भविष्यात वाल्मिक कराड होण्याची कुणी हिंमत करणार नाही अशी कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रात राखण्याचा प्रयत्न करा. बीड म्हणजे बिहार नाही, बीड म्हणजे मिर्जापूर नाही, बीड महाराष्ट्राचं अविभाज्य अंग आहे; त्याला दुखापत झाली तर सर्वांगाला वेदना होणारच की!

Share This News
error: Content is protected !!