सिल्लोड: छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) सिल्लोड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Chhatrapati Sambhajinagar) शाळेतून पायी घरी जाणाऱ्या एका विद्यार्थ्याला पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्याने एका 12 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला. हा अपघात मंगळवारी म्हसला फाटा- सोनाप्पावाडी रस्त्यावर घडला. मयूर गणेश राजपूत (वय 12, रा. सोनाप्पावाडी) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर संग्राम सरदारसिंग लकवाल (रा. सोनाप्पावाडी) असे आरोपी ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे.
काय घडले नेमके?
मयूर राजपूत हा भराडी (ता. सिल्लोड) येथील सरस्वती भुवन प्रशालेत शिक्षण घेत होता. तो दररोज सोनाप्पावाडीहून म्हसला फाट्यावर पायी यायचा आणि तेथून बसने भराडीला शाळेत जा-ये करीत असे. मंगळवारी दुपारी तो नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर फाट्यावर उतरून घरी जात होता. याच दरम्यान एक विनापासिंग ट्रॅक्टर पाठीमागून आला. या ट्रॅक्टरने त्याला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती कि यामध्ये मयूरचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरसह घटनास्थवरून पळ काढला.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर, बिट जमादार विष्णू कोल्हे यांनी धाव घेऊन मृतदेह सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणला. या अपघाताची ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शानाखाली सचिन क्षीरसागर करीत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.