सोलापूर : सोलापूरमधून (Solapur Crime News) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सोलापूर (Solapur Crime News) शहरातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक अजिंक्य राऊत यांनी राहत्या घरी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. सोलापुरातील एका प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाने आत्महत्या केल्याने सोलापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
कोण होते अजिंक्य राऊत ?
अजिंक्य जयवंत राऊत (वय 55) हे सोलापुरातील प्रसिद्ध असे हॉटेल व्यावसायिक होते. शहरातील लेडी डफरीन (इंदिरा गांधी) चौक ते जुन्या एम्प्लॉयमेंट चौकादरम्यान असलेल्या प्रसिद्ध हॉटेल ध्रुवचे अजिंक्य राऊत हे मालक होते. त्यांचे वडील दिवंगत डॉ. जयवंत राऊत हे सोलापूर शहरातील निष्णात शल्यविशारद होते.अजिंक्य राऊत हे प्रतिष्ठित आणि श्रीमंत घराण्यातील होते. राऊत यांचा मोठा मित्र परिवार होता. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, सिनेनाट्य कलावंत, मोठ्या उद्योजकांशी अजिंक्य राऊत यांचे घनिष्ट संबंध होते. मात्र ते मागच्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर सोलापूर शहरातील खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू होते.
अजिंक्य राऊत यांनी गुरुवारी दुपारी विजापूर रस्त्यावरील इंदिरा नगरमध्ये आपल्या राहत्या घरी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आपल्या आयुषयाचा शेवट केला आहे. गोळी झाडल्याचा आवाज ऐकताच दुसऱ्या खोलीमध्ये असणारी त्यांची पत्नी तातडीने त्या ठिकाणी धावत गेली. यानंतर त्यांनी शेजारांच्या मदतीने रुग्णवाहिका मागवून पती अजिंक्य यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र अजिंक्य यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. विजापूर नाका पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.