सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमध्ये (Sindhudurg Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये सिंधुदुर्गातल्या देवगड तालुक्यातील मिठबांव येथील प्रसाद परशुराम लोके या तरुणाचा 4 दिवसांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. यानंतर गुरुवारी पहाटेच्या सुमारास प्रसाद यांची पत्नी मनवा प्रसाद लोके (वय 27) यांनी घराच्या टेरेसवर ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. आपल्या पतीच्या मृत्यूमुळे त्या नैराश्यात होत्या. याच तणावामध्ये त्यांनी आत्महत्या केली असल्याचे प्राथमिकदृष्ट्या समजत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिठबांव येथील प्रसाद परशुराम लोके (वय 31) यांचा सोमवारी सकाळी मुणगे-मसवी रस्त्यावर त्याच्याच गाडीच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या डोक्यावर, कपाळावर वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी प्रसाद यांच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी या हत्येप्रकरणी किशोर परशुराम पवार (रा. कुंभारमाठ) याला अटक केली होती. यानंतर पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार, गाडी व रक्ताचे डाग असलेले कपडे ताब्यात घेतले होते.
यादरम्यान अचानक प्रसाद यांची पत्नी मनवा यांनी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. गुरुवारी पहाटे मनवा हिचे सासरे परशुराम लोके यांना 6 वाजेच्या सुमारास टेरेसेवरील आणि जिन्यामधील लाईट सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी मनवाच्या सासूला उठविले. यावेळी आपल्या बाजूला झोपलेली मनवा बाजूला नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर सासरे परशुराम लोके, सासू, दीर या सर्वांनी तिचा शोध घेतला. यावेळी घराच्या टेरेसवर जाण्याचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी टेरेसवर जाऊन पाहिले असता टेरेसवर शेडच्या लोखंडी अँगलला मनवाने ओढणीने गळफास घेतल्याचे आढळून आले. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गळफास लावलेल्या स्थितीतील मृतदेह खाली काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेनासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पतीचा घातपाती मृत्यू झाल्याने मनवा नैराश्यात होत्या. त्याच तणावामध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. असं असलं तरी पतीच्या खून प्रकरणानंतर तीन दिवसांनी पत्नीने गुढरित्या आत्महत्या केल्यामुळे पोलिसांसमोरील गुंता अजून वाढला आहे.