सातारा : साताऱ्यामध्ये (Satara News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Satara News) पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. कोयनानगर मार्गावर शुक्रवारी रात्री आयशर चारचाकी गाडी व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
काय घडले नेमके?
कोयना विभागातील तोरणे प्रसाद आनंदा कदम (वय 23 वर्ष) आणि प्रणय उत्तम कांबळे (वय 22 वर्ष, कोयनानगर हुंबरळी), धीरज संतोष बनसोडे (वय 18 वर्ष, नाशिक, सध्या रा. कोयनानगर) असे तिघे दुचाकीवरून निघाले होते. गोषटवाडी गावाजवळ वळणावर समोरून आलेल्या आयशर टेम्पोची आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. या धडकेनंतर तिघेही रस्त्यावर कोसळले.
ही धडक एवढी भीषण होती कि, या अपघातात दुचाकीवरील धीरज संतोष बनसोडे हा युवक जागीच ठार झाला. तर प्रणय उत्तम कांबळे याला उपचारासाठी गाडीतून नेत असताना त्याचा मृत्यू झाला. तर प्रसाद कदम हा जखमी झाला असून, त्याच्यावर पाटण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताच्यावेळी प्रसाद हा गाडी चालवत होता. पोलिस भरतीची तयारी करण्यासाठी रनिंग करण्यासाठी गेलेल्या दोन्ही युवकांचा मृत्यू झाल्याने कोयना परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताची नोंद रात्री उशिरा कोयनानगर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून ते पुढील तपास करत आहेत.