Breaking News
Satara News

Satara News : घराच्या वास्तुशांतीनिमित्त लाईटीचे तोरण बांधताना तरुणाचा शॉक लागून मृत्यू

585 0

सातारा : साताऱ्यामध्ये (Satara News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये घराच्या वास्तुशांतीनिमित्त लाईटीचे तोरण बांधताना तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील मसूर (ता. कराड) येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. संदीप बाजीराव वायदंडे (वय 39 वर्ष) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे संदीपच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

काय घडले नेमके?
मसूरमधील सामाजिक कार्यकर्ते बाजीराव वायदंडे यांचा संदीप हा कनिष्ठ चिरंजीव होता. मसूरजवळील शहापूर येथे त्याच्या दुकानाशेजारी सीमा लक्ष्मण मंदुळकर यांनी बांधलेल्या नवीन घराच्या वास्तूशांतीनिमित्त सोमवारी सकाळी घटाला तोरण बांधण्यासाठी संदीप गेला होता. तोरण बांधत असताना घराजवळून गेलेल्या विद्युत वाहक तारेला स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार धक्का लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मातंग समाजातील अत्यंत कष्टाळू, सतत हसतमुख, निर्व्यसनी आणि सर्वांच्या मदतीला धावणारे व्यक्तिमत्त्व म्हणून संदीपला ओळखले जात होते. त्याचा मित्रपरिवारही मोठा होता. संदीप केटरिंग व भाजीपाला या व्यवसायाबरोबरच रिक्षावर कुटुंबाचा चरितार्थ चालवत होता. त्याच्या आकस्मिक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या माघारी दोन मुले, पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

Share This News
error: Content is protected !!