छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी रात्री दोन गटात प्रचंड हाणामारी होऊन दंगल झाली. या दंगलीत दगडफेक होऊन पोलिसांच्या गाड्या देखील जाळण्यात आल्या. आता या दंगलीवरून राजकारण पेटले असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यामुळेच दंगल भडकल्याचा आरोप केला आहे. त्याला इम्तियाज जलील यांनी उत्तर दिले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी रात्री गाडीचा धक्का लागल्यावरून शाब्दीक चकमक झाली. त्यावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. समाजकंटकांनी पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक करत वाहने जाळली. त्यामुळे संभाजीनगरमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. इम्तियाज यांनी केलेल्या भाषणाचा परिणाम युवा वर्गावर झाला. त्यामुळे दंगल भडकली. दंगलीत अर्धा तासात पेट्रोल बॉम्ब कुठून आले? असा सवाल त्यांनी केला. आमचं शहर अंतकवादी लोकांच्या हिटलिस्टवर आहे. आम्हाला काही शांतता भंग करायची नाही. ज्या लोकांनी हे घडवून आणल आहे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. यासंदर्भात आपण पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सुद्धा मी बोलणार असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. ही घडवून आणलेली दंगल असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला.
विरोधकांकडून या विषयावर राजकारण केले जात आहे. लोकशाहीमध्ये कुणी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला रोखलं तर त्यांच्या भावना तीव्र होतात आणि नंतर तेच बोलतात की,लोकशाहीचा गळा घोटला गेला. त्या लोकांच्या हातातून हिंदूच राजकारण निघून गेले आहे त्यामुळे त्यांची चिंता वाढलेली आहे, असा आरोप त्यांनी ठाकरे गटातील नेत्यांवर केला.
संजय शिरसाट यांच्या आरोपावर उत्तर देताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले, “या घटनेतील बेधुंद तरुणांनी माझ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. दोन वेळा मी पोलिसांची लाठी-काठी घेऊन जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र माझ्यावर तरुण दगड फेकत होते. त्यामुळे पोलिसांनी मला आत बसवलं. मी तीन तास तिथे होतो. तिथे अनेक राम मंदिरातले कर्मचारी होते. कोणत्याही परिस्थितीत मंदिराला कुणी हात लावणार नाही, ही जबाबदारी माझी आहे, असं आश्वासन दिलं”
“राम मंदिरातलं सीसीटीव्ही फुटेज पाहा आणि सगळी परिस्थिती समोर येईल. नशेबाज तरुणांनी हा गोंधळ घातला. एवढ्या मोठ्या जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी फक्त १५ ते १७ पोलीस उभे होते. मी वरिष्ठांना कॉल करत होते, तेव्हा सगळेच नुसते येतोय येतोय म्हणाले. दोन तासात सगळे तिथे आले, मात्र तोपर्यंत सगळं घडलं होतं. या घटनेत काही जीवितहानी झाली नाही, हे बरं झालं” असं इम्तियाज जलील यांनी सांगितलं. अशा प्रकारचे आरोप नेहमीच माझ्यावर होतात. मी एक सॉफ्ट टार्गेट असल्यासारखे नेते बोलत असतात. पण या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी खा. जलील यांनी केली आहे.
घटना काय घडली ?
शहरातील किराडपुरा भागातील राम मंदिर परिसरात काल रात्री दोन गटात प्रचंड राडा झाला. गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात आधी शाब्दिक चकमक सुरु झाली. या वादाचं रुपांतर भांडण, हाणामारीत झालं. त्यानंतर दोन गटाकडून तुफान दगडफेक करण्यात आली. तणावावर नियंत्रण मिळवण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही हल्ला झाला. पोलिसांच्या जवळपास १० ते १२ गाड्या जाळण्यात आल्या. जवळपास दोन ते तीन तास हा प्रकार सुरु होता.
४०० ते ५०० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
किराडपुऱ्यात मध्यरात्रीतून झालेल्या राड्याप्रकरणात तब्बल ४०० ते ५०० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संभाजीनगर पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, किराडपुऱ्यातील हाणामारी, जाळपोळ, दगडफेक प्रकरणी ४०० ते ५०० अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.