पुणे : पुण्यातील (Pune Blast) चाकण शिक्रापूर हायवेवर एक भीषण घटना घडली आहे. या ठिकाणी गॅस कंटेनरचा भीषण स्फोट झाला आहे. यामुळे आजूबाजूचा संपूर्ण परिसर हादरला आहे. हा स्फोट झाल्यानंतर गॅस कंटेनरने पेट घेतल्याने दोन ते तीन कंटेनर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. याशिवाय एक हॉटेल आणि तीन घरांना मोठी आग लागली. पहाटे पाचच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
काय घडले नेमके?
एका ढाब्याच्या (छोटं हॉटेल) समोर कंटनेरमधून गॅस चोरी केली जात होती. एका कंटेनर मधून घरगुती आणि कमर्शियल टाक्यांमध्ये गॅस चोरी करणं सुरू होतं. अशात गॅसचा स्फोट झाला, घटनास्थळी तीन ते चार टाक्या फुटलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या आहेत. या स्फोटाने मोठी आग लागली होती. या आगीत ढाब्यासह तिथं पार्क असणाऱ्या इतर वाहनांना ही मोठी आग लागली. तसेच स्फोटाच्या धक्क्याने आजूबाजूच्या घरांचे ही नुकसान झाले आहे. शेल पिंपळगावमधील ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारे मात्र पसार झालेत. या प्रकरणी चाकण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास केला जात आहे.