पुणे : अज्ञान हे अनेक प्रकारच्या फसवणूक आणि गुन्ह्यांना सहज घडवून आणण्यासाठी सर्वात मोठा मार्ग आहे. अर्थात केवळ बँकेतील व्यवहार समजत नाहीत, ऑनलाइन व्यवहार जमत नाहीत , आणि बँकेतील लोक सहकार्य करत नाहीत…! या कारणामुळे कोथरूड परिसरातील केळेवाडी ,किष्किंधानगर ,सुतारदरा जय भवानी नगर या भागातील असंख्य महिलांनी फंडामध्ये पैसे गुंतवले होते . चांगले शिक्षण, स्वतःचे घर ,चांगले आयुष्य जगण्यासाठी अनेक महिलांनी पै-पै जमा करून एका महिलेकडे फंडामध्ये पैसे जमा करण्यासाठी देण्यास सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा खंडू मारणे या 15 वर्षे फंड चालवत होत्या. महिना तीन टक्के प्रमाणे 36 टक्के व्याजदराने पैसे मिळतील , असे त्यांनी या महिलांना सांगितले होते . अनेक जणींना पैसे मिळाले देखील ,परंतु त्यानंतर या महिलेने ज्या महिलांकडून फंडात पैसे जमा करण्यासाठी पैसे गोळा केले होते , त्यांचे फोन घेणे देखील टाळण्यास सुरुवात केली.
त्यानंतर या महिले विरुद्ध 24 नोव्हेंबर 2021 रोजी विमल यादव यांच्यासह 31 जणांनी कोथरूड पोलीस मध्ये तक्रार दाखल केली होती. या महिलेला चौकशीसाठी बोलवल्यावर तिने पैसे देण्याचे आश्वासन दिले होते . त्यामुळे त्यावेळी तिच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता . परंतु आता संबंधित सर्व फिर्यादी या महिलेकडे पैसे मागून थकले आहेत .
“आंधळ्या विश्वासाने आम्ही पैसे गुंतवले आता ,त्याचा पश्चात्ताप होत आहे” अशी प्रतिक्रिया या तक्रारदारांनी दिली. या महिलांनी रीतसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद करावी, या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल . असे आश्वासन कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिले आहे.