बहिणीला भेटण्यासाठी निघाला मात्र तिकडे पोहोचण्यापूर्वीच तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
परभणी : परभणी (Parbhani) जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये बहिणीला भेटण्यासाठी निघालेल्या तरुणाचा उष्माघाताने (heatstroke) मृत्यू (Dead) झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून परभणीमध्ये उन्हाचा तडाखा खूप वाढला आहे. घटनेच्या दिवशी मृत व्यक्ती भर दुपारी पायी निघाला होता. यादरम्यान त्याला चक्कर आल्याने त्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. ही परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील सिरसम या गावामध्ये घडली आहे. माणिक हरिभाऊ कोकरे (Manik Haribhau Kokare) असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील सिरसम येथील रहिवासी माणिक हरिभाऊ कोकरे हे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी उंडेगाव येथे पायी दुपारी भर उन्हामध्ये निघाले होते. यादरम्यान त्यांना पायी चालत असताना चक्कर आल्याने ते जमिनीवर कोसळले. दुपारची वेळ असल्यामुळे रस्त्यावर वर्दळ कमी होती त्यामुळे कोकरे उन्हामध्येच पडून राहिले.
याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना समजताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना तातडीने उपचारासाठी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. यानंतर कोकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
