नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये पोलिस दलात भरतीचा सराव करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. पहाटेच्या सुमारास (Nashik News) धावण्याचा सराव करताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे काल पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे या तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
काय घडले नेमके?
भरत पोपट जाधव असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे अनेक तरुण पोलिस दलात भरतीची तयारी करत आहे. त्यासाठी ते दररोज पहाटे व सायंकाळी धावण्याचा सराव आणि व्यायाम करतात. यात भारत जाधव हाही पोलिस भरती होण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून दररोज पहाटे उठून आपल्या मित्रांसोबत धावण्याचा सराव करत होता.
घटनेच्या दिवशी (Nashik News) भरत देखील नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसमवेत तो धावण्याचा सराव करत होता. पहाटेच्या सुमारास धावत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागल्याने तो जमिनीवर कोसळला. यावेळी सोबतच्या मित्रांनी त्याला तत्काळ सिन्नरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. भारतच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.