Crime News

Crime News : शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील काका पुतण्याची हत्या

619 0

धुळे : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मलगाव शिवारातील पिपल्यापाडा येथे शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील दोन गटात तुफान हाणामारी (Crime News) झाली. हा वाद एवढा विकोपाला गेला कि यामध्ये काका पुतण्याला आपला जीव गमवावा लागला तर अन्य पाच जण जखमी झाले. यापैकी एक जण गंभीर आहे. यामधील जखमींवर नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

काय घडले नेमके?
मध्य प्रदेशच्या सीमेलगत मलगावजवळील (ता. शहादा) पिपल्यापाडा येथे एकाच कुटुंबातील दोन गटांत शेतजमिनीचा वाद होता. त्यावरून दोन्ही गटांत शेतातच हाणामारी झाली. हाणामारीत तलवारी, विळा, लाकडी दांडके आदी हत्यारांचा वापर करण्यात आला. हाणामारी एवढ्यावरच न थांबता थेट गावठी पिस्तुलातून दोन फैरी झाडण्यात आल्या.

गोळीबारात अविनाश सुकराम खर्डे (वय 26, रा. मलगाव, ता. शहादा) जागीच ठार झाला, तर त्याचे काका रायसिंग कलजी खडे (54) यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. सुकराम कलनी खर्डे (वय 42), गणेश दिवाण खर्डे (24), रामीबाई दिवाण खडें (सर्व रा. मलगाव, ता. शहादा), सुनील राजेंद्र पावरा (23), अरुण राजेंद्र पावरा (दोघे रा. बेडिया, ता. पानसेमल, मध्य प्रदेश) असे 5 जण यामध्ये जखमी झाले. जखमीमध्ये अविनाश खर्डे यांचे वडील सुकराम यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी पोलिसांत देवेसिंग रायसिंग खर्डे व सोनीबाई गणेश खर्डे यांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!