Nagpur News

Nagpur News : नागपूर हळहळलं ! ‘या’ कारणामुळे चिमुकलीसह वृद्ध व्यक्तीचा दुर्दैवी अंत

422 0

नागपूर : नागपूर जिल्ह्यात (Nagpur News) 2 मन हेलावून टाकणाऱ्या घटना घडल्या आहेत. यामध्ये विजेच्या धक्क्यामुळे चिमुकलीसह एका वृद्ध व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोन्ही घटना 2 वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असल्या तरी त्याचे कारण मात्र एक होते. यामुळे परिसरात खळबळदेखील उडाली आहे.

पहिल्या घटनेत रामटेक पोलीस ठाण्यांतर्गत संग्रामपूर येथे राहणारी श्रेयांसी गौरीशंकर म्हस्के ही तिच्या आजी-आजोबांकडे राहत होती. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आजीच्या घरातील विहिरीजवळ खेळत असताना तिचा हात विहिरीच्या पंपाच्या मोटारीच्या तारेवर पडला. यामुळे तिला विजेचा जोरदार धक्का बसला आणि ती बेशुद्ध झाली.तिला उपचारासाठी रामटेक येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून तिला उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे रेफर करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. रामटेक पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

तर दुसरी घटना मनसर येथील 75 वर्षीय दुष्यंत सीताराम चौकसे यांच्यासोबत घडली. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास दुष्यंत सीताराम चौकसे यांनी पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी बटण दाबताच त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते बेशुद्ध झाले. त्यांना रामटेक उपजिल्हा रुग्णालयात नेले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन्ही घटनांबाबत रामटेक पोलिसांनी आकस्मिक अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!