नागपूर : नागपूरमधून (Nagpur Crime) एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर आईच्या प्रियकराने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पीडितेने आईला याची माहिती दिली मात्र तिने आपल्या मुलीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. पीडितेच्या लहान बहिणीवरही आरोपीने वाईट नजर ठेवल्याने हद्द झाली. अखेर एक दिवस मुलगी तिच्या मित्रासोबत घरातून पळून गेली आणि तिने थेट पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या आईला अटक केली असून तिच्या प्रियकराचा शोध सुरू आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
2 ऑक्टोबर रोजी जरीपटका पोलिस ठाण्यात 16 वर्षीय तरुणीच्या हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी 11 ऑक्टोबर रोजी ही अल्पवयीन मुलगी शोधून तिची चौकशी केली असता पोलिसही चक्रावून गेले. वास्तविक, आईच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून ही तरुणी आपल्या मित्रासोबत पळून गेली होती. पीडित मुलीच्या वडिलांचा 2019 मध्ये अपघाती मृत्यू झाला होता. किशोरीला 14 वर्षांची लहान बहीणही आहे. तीची आई लोकांच्या घरी धुणी-भांडी धुण्याचे काम करते. तरूणीच्या आईचे कळमना येथील आरोपी रोहित चौरे याच्याशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे आरोपी अनेकदा तिच्या घरी यायचा. दारू पिऊन आरोपी रोहित चौरे हा अनेकदा महिलेच्या घरी राहायचा. 12 जून रोजी दारूच्या नशेत आरोपीने पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपी घरातून निघून गेल्यावर पीडितेने तिच्या आईला याची माहिती दिली मात्र आईने तिला कशांत राहण्यास सांगितले.
यानंतर आरोपीने पीडितेला अनेकदा शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. यावेळी आरोपीने तिच्या 14 वर्षांच्या लहान बहिणीसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचे पीडितेचा लक्षात आले. पीडित मुलीला हे सहन न झाल्याने तिने आरोपीशी हुज्जत घातली आणि पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. त्यामुळे आरोपी काही दिवस शांत राहिला त्यानंतर त्याने तिला फोनवर शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पीडिते तरुणी तिच्या मित्रासोबत घरातून पळून गेली. यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिच्या आईला अटक केली असून आरोपी रोहित चौरेचा शोध सुरु आहे.